esakal | जुन्या जागा मालकाची थकबाकी; नवीन ग्राहकाच्या खिशाला लावतेय कात्री
sakal

बोलून बातमी शोधा

electricity bill

जुन्या जागा मालकाची थकबाकी; नवीन ग्राहकाच्या खिशाला लावतेय कात्री

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : जागा विकत घेतली...तुमचे वीज बिल (Electricity bill) देखील तुम्ही नियमीत भरत आहात. मात्र तुम्ही जी जागा विकत (land purchasing) घेतली आहे, त्या जागा मालकाने महावितरणची बिले भरली आहेत ना? याची खातरजमा करा. ही खातरजमा न केलेल्या ग्राहकांच्या (consumers) खिशाला जुन्या मालकाची थकबाकी सध्या कात्री लावत आहे. एसओपी कायद्यानुसार (sop act) जुनी थकीत रक्कम नवीन ग्राहकाकडून वसूल करण्याचे निर्देश असून त्यानुसार महावितरणकडून (MSEB collections) थकीत बिलांची वसुली करण्यात येत आहे.

हेही वाचा: डोंबिवलीच्या 'त्या' खड्डयातून कुंडीची चोरी होताच पुन्हा अपघात

गेल्या अनेक वर्षांपासून वापरत असलेल्या जागेचे वीज बिल ग्राहक नियमित भरत आहेत. मात्र जुन्या जागा मालकाची महावितरणची थकबाकी असल्याने ती थकबाकी नवीन जागा मालकाने भरावी यासाठी ग्राहकांना महावितरणची नोटीस येत आहे. एसओपी रेग्युलेशन 2021 कायद्यानुसार थकीत रकमेचा भरणा नवीन ग्राहकांकडून वसूल करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले आहेत. त्यानुसार महावितरण थकबाकी वसुली करत आहे. नोटीस पाठविल्यानंतर सात दिवसांत कार्यालयाशी संपर्क साधावा. थकीत रक्कमेचा भरणा करावा अन्यथा थकीत रक्कम नवीन वीज ग्राहक क्रमांकात वळती करण्यात येणार असल्याचे नोटीस मध्ये महावितरणने नमूद केले आहे.

ही थकबाकी त्या जागेवरची आहे. व्यवहार करताना किंवा जागेचे मालकीहक्क बदलताना नविन ग्राहकांनी महावितरणची थकबाकी नाही ना? याची शहनिशा केली पाहिजे. थकबाकी असल्यास नवीन जागा मालकाने जुन्या मालकास ती भरण्यास सांगणे किंवा त्यांच्याकडून नविन जागा मालकांनी ती वळती करून घेणे आवश्यक आहे. एसओपी कायद्यानुसार जागेवरील थकबाकी नविन ग्राहकांच्या बिलात वळती करण्याचा अधिकार महावितरणला आहे. त्यामुळे ग्राहकांना सूचित केले जात असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये चार पटीने वाढ

"घर विकत घेऊन आम्हाला 14 वर्षे झाली. त्यावेळी मीटर नावावर वळती करताना महावितरणने जुनी थकबाकी काही आहे का? याची कल्पना देणे गरजेचे आहे. एवढ्या वर्षानंतर थकबाकीची जाग महावितरणला आली आहे का? तसेच जी थकबाकी आहे कोरोनाचा काळात नव्या जागा मालकाला ती भरणे शक्य आहे का? याचा ही विचार करावा. आता आम्ही जुन्या जागा मालकाचा शोध कुठे घेत बसायचा. महावितरणची ही वसुली योग्य नाही."

- संजय कुंभार, ग्राहक

"एखादी मालमत्ता जेव्हा एकाकडून दुसऱ्याकडे वळती होते. तेव्हा सरकारी नियमानुसार जागेचे रजिस्ट्रेशन होताना जे हमीपत्र बनते त्यावर भविष्यात या जागेवर काही बोजा निघाला तर समोरच्याला ते मान्य आहे असे स्पष्ट उल्लेख असतो. तसेच वीज बिलाचे देखील आहे त्या जागेवर ती थकबाकी असल्याने ती त्या जागेवरील नवीन ग्राहक क्रमांकावर वळती होत असते. मालमत्ता घेण्याआधी ग्राहकांनी सर्व गोष्टी क्लिअर आहेत का पहाणे गरजेचे आहे."

- दिलीप हरणे , प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कल्याण पूर्व उप विभाग 3

loading image
go to top