अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडली! विद्यार्थी शिक्षणापासून वंचित; पालक, शिक्षक संभ्रमात 

अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडली! विद्यार्थी शिक्षणापासून वंचित; पालक, शिक्षक संभ्रमात 

मुंबई : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षणावर भर दिला; परंतु दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अकरावीत गेलेले विद्यार्थी गेल्या सात महिन्यांपासून शिक्षणापासून वंचित आहेत. अकरावीचे पहिले सत्र संपले तरी यंदा प्रवेश प्रक्रियाच सुरू न झाल्याने शिक्षक, विद्यार्थी, पालक संभ्रमात आहेत. 

लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल यंदा उशिरा जाहीर झाल्याने प्रवेश प्रक्रियाही उशिरा सुरू झाली. अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यावर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने या प्रवेशप्रक्रियेलाही "थांबा' लागला. अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबाबत कोणताही विचार शिक्षण विभागाने केलेला नाही. त्यामुळे पहिलीच्या वर्गातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत असताना मात्र अकरावीचे विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावीच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या परीक्षेनंतर पुन्हा बारावीच्या वर्षाला सामोरे जावे लागणार असल्याने विद्यार्थी, पालक चिंतेत आहेत. मराठा आरक्षणामुळे रखडलेली अकरावी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया कधी सुरू होणार? असा प्रश्‍न विद्यार्थी, पालकांसह प्राध्यापक व प्राचार्यांकडून विचारला जात आहे. 

केवळ 78,610 विद्यार्थ्यांचा प्रवेश 
अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेद्वारे एसईबीसी आरक्षणानुसार राज्यभर केवळ 4,199 विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले आहेत; तर आतापर्यंत 78,610 विद्यार्थ्यांनीच अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेतला असून, अद्याप हजारो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. शिक्षक संघटनांनी याविषयी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतरही ठोस निर्णय घेण्यात येत नसल्याने संघटनांकडून शिक्षण विभागाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. 

दहावीची मार्च महिन्यात परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी अभ्यासापासून लांब आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाने कोणतेही नियोजन केलेले नाही. अकरावीत प्रवेश झाला नसल्याने विद्यार्थी तणावात आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने युद्धपातळीवर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी नियोजन करावे. 
- सुभाष मोरे,
कार्यवाह, शिक्षक भारती संघटना. 

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com