Elphinstone Bridge Closure

Elphinstone Bridge Closure

ESakal

Mumbai News: एल्फिन्स्टन पूल बंदचा फटका! वाहतूक कोंडीसह मुंबईकरांच्या खिशालाही भुर्दंड

Elphinstone Bridge Closure: एल्फिन्स्टन रेल्वेपूल शुक्रवार (ता. १२) रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील वाहनांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
Published on

मुंबई : प्रभादेवी आणि परळला जोडणारा मध्य मुंबईतील महत्त्वाचा एल्फिन्स्टन रेल्वेपूल शुक्रवार (ता. १२) रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील वाहनांना करी रोड, चिंचपोकळी मोठा आणि दादर येथील टिळक पुलावरून प्रवास करावा लागत असल्याने मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे पूल बंद केल्यानंतर पहिल्याच दिवशी शनिवारी (ता. १३) या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी बहुतांश कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे वाहनांची वर्दळ कमी होती; मात्र सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी वाहनांच्या संख्येत वाढ होणार असल्याने हा दिवस वाहनचालकांची सत्त्वपरीक्षा घेणारा ठरणार आहे.

एल्फिन्स्टन पूल बंद केल्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. शनिवारी त्याची छोटीशी चुणूक पाहायला मिळाली. परळ-प्रभादेवी प्रवासाच्या पाच-सात मिनिटांच्या प्रवासासाठी पाऊण तासांहून अधिक वेळ लागत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. लालबाग, दादर, परळ, प्रभादेवी परिसरात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

Elphinstone Bridge Closure
फळांमध्ये गोडवा कुठून येतो? निसर्गाचा हा चमत्कार कसा घडतो?

सोमवारी (ता. १५) सकाळी या परिसरात दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी असल्याने हालात प्रचंड भर पडणार आहे. वाहतूक दादर, करी रोड व चिंचपोकळीच्या दिशेने वळवल्याने त्यांना दोन ते तीन किलोमीटरचा फेरा पडत आहे.  यामुळे वेळेसोबतच इंधन खर्चातही वाढ झाल्याने वाहनधारकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.

चिंचपोकळी पूल टाळू नका!

  • एल्फिन्स्टन रेल्वे पुलावरील वाहतूक करी रोड, चिंचपोकळी आणि दादर येथील टिळक या पुलांवर वळवण्यात आली आहे. वाहनचालक केवळ जवळच्या करी रोड, टिळक पुलांचा वापर करतात.

  • चिंचपोकळीचा पूल दूर असल्याने अनेक जण तो टाळत आहेत. टिळक पूल अरुंद असल्याने त्यावर वाहनांची रांग लागत आहेत, तर करी रोड पुलावर एकेरी वाहतूक ठप्प होत आहे.

सर्वाधिक फटका कुठे?

  • दादरच्या टिळक पुलावरून अवजड वाहतूक वळवल्यामुळे भारमानात सर्वाधिक वाढ

  • माटुंग्यातील माहेश्‍वरी उद्यान ते धारावीपर्यंत वाहतुकीत अडथळे

  • करी रोड-चिंचपोकळीपर्यंत वाहतुकीचा ताण वाढून गोखले रोड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर कोंडी वाढणार

  • ४५ मिनिटे - सायन ते दादरच्या १५ मिनिटांच्या प्रवासासाठी पाऊण तास

  • २ तास - नवी मुंबई ते परळदरम्यान ४५ मिनिटांच्या प्रवासाला दोन तास

येथे असेल लक्ष

दादर टीटी जंक्शन, कबुतरखाना जंक्शन, भवानी शंकर रोड, परळ जंक्शन, भारतमाता जंक्शन, ना. म. जोशी मार्ग

Elphinstone Bridge Closure
Navi Mumbai News: वाशीत वायू प्रदूषण! श्वास घेण्यास त्रास; घसा खवखवण्याच्या प्रकारात वाढ

करी रोड पुलावर वाहनांची संख्या वाढली आहे. सोमवारी वाहनांचा भार आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे. वाहनचालकांनी वाहतूक अधिसूचनेचे पालन करावे. त्यामुळे त्यांचाच त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. 

- सरदार नाळे , पोलीस निरीक्षक, भोईवाडा वाहतूक विभाग 

टिळक पुलावरून एका वेळी दोनच वाहने जाऊ शकतात. नेहमीच्या तुलनेत या पुलावर वाहनांची संख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली जाणार आहे. टिळक पुलाऐवजी त्यांना चिंचपोकळी पूल किंवा सातरस्ता मार्गाचा वापर करता येईल. 

- कन्हैयालाल शिंदे, पोलीस निरीक्षक, दादर वाहतूक विभाग 

पूल बंद केल्यामुळे टॅक्सीने फिरणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला फटका बसणार आहे. कर्मचारी कोंडीत अडकल्यामुळे त्यांना कार्यालयीन वेळ गाठणे कठीण हाेणार आहे. अंतर वाढल्यामुळे वाढीव भाड्यावरून वादाचे प्रसंग उद्‌भवण्याचीही शक्यता आहे.

- संदीप कदम, टॅक्सीचालक, चिंचपोकळी

पूल बंद झाल्यामुळे दादर पूर्व-पश्चिम प्रवासात प्रचंड कोंडी सहन करावी लागत आहे. पार्किंगसंदर्भातही माेठी समस्या निर्माण होणार आहे.  वाहतूक विभाग आणि प्रशासनाने वाहतूक कोंडीचा आधीच विचार करून उपाययाेजना करणे आवश्यक हाेते. पुलाखाली उभ्या असलेल्या बस हटवायला हव्‍यात.

- सुधीर भोसले, स्थानिक रहिवासी, प्रभादेवी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com