जीवदानी मंदिरात हात धुतल्यानंतरच प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020


विरारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर प्रशासन सतर्क

नालासोपारा : विरारच्या जीवदानी मंदिरात दर रविवारी हजारो भाविक जीवदानी मातेच्या दर्शनासाठी गर्दी करतात; सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आज (ता. १५) तुरळक भाविकांनीच हजेरी लावली. आलेल्या भाविकांना हातावर सॅनिटायझर टाकून हात साफ करूनच मंदिरात प्रवेश दिला जात होता. कोरोना हा जीवघेणा विषाणू असल्याने येणाऱ्या भाविकांची पूर्ण काळजी घेऊन कोरोनाविषयी जनजगृती केली जात असल्याचे जीवदानी मंदिराचे व्यवस्थापक नितीन पाटील यांनी सांगितले आहे.

कोरोनाबाबत अफवा पसरवताय, मग भोगा ही शिक्षा...

मुंबईच्या वेशीवर विरारच्या जीवदानी मातेचा डोंगर आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह महाराष्ट्र, गुजरात परिसरातून लाखो भाविक जीवदानी मातेच्या दर्शनासाठी येतात. आठवड्याच्या दर रविवारी हजारो भाविक जीवदानीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात; मात्र काही दिवसांपासून कोरोनामुळे काही प्रमाणात का होईना भाविकांची गर्दी कमी झाली आहे. जे भाविक येत आहेत, त्या भाविकांना कोरोना या आजारापासून रोखण्यासाठी मंदिर प्रशासन सतर्क झाले आहे. 

राजकीय निवडणुका कोरोनाच्या सावटाखाली...

मंदिराच्या पायथ्याच्या पहिल्या गेटवरच भाविकांच्या रांगा लावून त्या ठिकाणी वृद्ध, लहान मुलांना मास्कचे वाटप करण्यात येत आहे. त्यानंतर त्यांच्या हातावर हॅण्ड वॉश टाकून हात साफ करूनच त्यांना आत सोडले जात आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातही हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर देण्यात येत आहे. पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या पाणपोईवर हॅण्डवॉश, साबण ठेवण्यात आले आहेत. कोरोनासंदर्भात जनजगृती करण्यात येत आहे.

जीवदानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी कमी झाल्यामुळे पूजेचे सामान विकणाऱ्या दुकानदारांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. ८० ते ९० टक्के रविवारच्या दिवशी येणाऱ्या भाविकांची संख्या आता ३० टक्‍क्‍यांवर येऊन पोहचली आहे. त्यामुळे येथील दुकानदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दर रविवारी पाच ते १० हजार रुपये धंदा होतो; पण कोरोनामुळे भाविकच येत नसल्याने आता हजार ते बाराशे रुपये धंदा होतो. यावरच उपजीविका सुरू आहे. त्यामुळे अार्थिक झळ सोसावी लागत आहे.
सुनील पाटील, देवेंद्र, दुकानमालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entrance only after washing hands at the jeevdani temple of Virar to prevent the outbreak of Corona