बलात्कारात मदत करणाराही तेवढाच दोषी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

दोषीची सक्तमजुरी उच्च न्यायालयात कायम 

मुंबई : बलात्काराच्या प्रकरणात आरोपीला मदत करणाराही त्याच्याइतकाच दोषी असून, त्यालाही तीच शिक्षा होऊ शकते, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. बलात्काराच्या खटल्यातील सहआरोपीला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षाही उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

हे ही वाचा....शरद पवार म्हणतात, हे जेवण आयुष्यभर लक्षात राहील 

नागपूर सत्र न्यायालयाने मागील वर्षी मार्चमध्ये बलात्काराच्या प्रकरणात सुनील रामटेके याला दोषी ठरवून 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात त्याने केलेली अपील याचिका न्या. व्ही. एम. देशपांडे यांच्या नागपूर खंडपीठाने नामंजूर केली. आरोपीने प्रत्यक्षात बलात्कार केला नसला, तरी बलात्कार करण्यासाठी मुख्य आरोपीला मदत केली. बलात्काराला प्रतिबंध करणाऱ्या पीडितेच्या बहिणीलाही त्याने दमदाटी आणि विरोध केला. त्यामुळे या खटल्यात तोही तेवढाच दोषी आहे आणि त्यालाही तीच शिक्षा लागू होते, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.

ऑगस्ट 2007 मध्ये 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला होता. सहआरोपीने तिला खोलीत बंद करून बाहेरून दाराची कडी लावली होती. तू मुख्य आरोपीला विरोध करू नकोस; मी तुला पैसे देईन, असेही त्याने सांगितले होते, असे अभियोग पक्षाने सांगितले. त्याने पीडितेच्या बहिणीलाही प्रतिबंध केल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. परंतु, काहीही चूक नसताना या गुन्ह्यात अडकवल्याचा दावा सहआरोपीच्या वकिलांनी केला होता.

हे ही वाचा....मुंबईतील हे प्रकल्प रखडलेलेचं 

भारतीय दंड विधानातील कलम क्र. 109 मध्ये अशा गुन्ह्यासाठी शिक्षेची स्पष्ट तरतूद नाही. तथापि, बलात्काराच्या गुन्ह्यात मदत करणाराही तेवढाच जबाबदार असतो. त्यामुळे त्याला तेवढीच शिक्षा होऊ शकते, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Equally guilty of helping rape