अखेर मान्यता मिळाली ! मुंबईत सुरु होणार स्वदेशी कोव्हॅक्सिन लसीची सर्वात मोठी चाचणी

भाग्यश्री भुवड
Thursday, 26 November 2020

मुंबई महापालिकेच्या सायन आणि राज्य सरकारच्या जे जे रुग्णालय आणि वैद्यकीय कॉलेजमध्ये कोव्हॅक्सिन या स्वदेशी लसीची क्लिनिकल ट्रायल या आठवड्यापासूनच सुरू होणार आहे

मुंबई, ता. 26 - मुंबई महापालिकेच्या सायन आणि राज्य सरकारच्या जे जे रुग्णालय आणि वैद्यकीय कॉलेजमध्ये कोव्हॅक्सिन या स्वदेशी लसीची क्लिनिकल ट्रायल या आठवड्यापासूनच सुरू होणार आहे. दोन्ही रुग्णालयांना एथिक समितीकडून चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. स्वदेशी लसीची क्लिनिकल ट्रायल मुंबईतील इतर लसींच्या चाचण्यांपेक्षा मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. 

पालिकेच्या सायन रुग्णालयाला कोव्हॅक्सिन लसीच्या क्लिनिकल ट्रायलला अखेर आज (गुरुवारी) एथिकल कमिटीने मान्यता दिली आहे. त्यानुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत रुग्णालयात या लसीची क्लिनिकल ट्रायल सुरू केली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एथिकल कमिटीच्या मान्यतेसाठी भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिन लसीची क्लिनिकल ट्रायल सायन रुग्णालयात रखडली होती. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयाच्या नैतिक समितीला ट्रायलच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता. मात्र, समितीकडून हिरवा कंदील मिळाला नसल्यामुळे या लसीची क्लिनिकल ट्रायल सुरु करण्यास विलंब झाला होता. मात्र, आता लसीचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच ही लस स्वयंसेवकांना दिली जाणार आहे. 

महत्त्वाची बातमी : काय सांगता ? शिवसेना आणि भाजप आलेत एकत्र आणि प्रस्तावही झाला मान्य, काँग्रेसचा सभात्याग; कोणता होता हा प्रस्ताव?

कोरोनाला हरवण्यासाठी मुंबईत अनेक लसीच्या चाचण्या सुरू आहेत. एकीकडे ऑक्सफर्डच्या परदेशी लसीच्या चाचण्या KEM, नायर रुग्णालय आणि पालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये सुरू आहेत. दुसरीकडे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या मदतीने विकसित झालेल्या स्वदेशी कोव्हॅक्सिन चाचणीसाठी भारत बायोटेकने पालिकेच्या सायन आणि शासकीय रुग्णालय जेजेची निवड केली आहे. दोन्ही रुग्णालयात तिसर्या टप्प्यातील लसीची चाचणी घेण्यात येणार आहे. 

सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, गुरुवारी झालेल्या बैठकीत रुग्णालयाच्या एथिक कमिटीकडून चाचणी घेण्यास परवानगी मिळाली आहे. स्वयंसेवकांच्या लसीकरणासाठी आम्ही जवळजवळ सर्व तयारी केली आहे. एक ते दोन दिवसात आम्हाला लस मिळेल आणि आम्ही चाचणी सुरू करू.

तर जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत मानकेश्वर यांनी सांगितले की, लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आयसीएमआरने जेजेची निवड केली आहे. आम्हाला रुग्णालयाच्या नैतिक समितीकडूनही परवानगी मिळाली आहे. आम्ही एका आठवड्यात चाचणी देखील सुरू करू. 

महत्त्वाची बातमी : २०१९ विधानसभा निकालांनंतर राष्ट्रवादीचे बडे नेते शरद पवारांचा मेसेज घेऊन वर्षावर गेले होते ? नवाब मलिकांनी दिलं उत्तर

दोन हजार स्वयंसेवकांची गरज - 

कोव्हॅक्सिन'ची चाचणी तिसर्‍या टप्प्यातील असल्याने यासाठी प्रत्येक रुग्णालयात 1000 स्वयंसेवक लागतील. डॉ. जोशी म्हणाले की, रूग्णालयात 300 स्वयंसेवक चाचणीसाठी दाखल झाले आहेत. जे जे रुग्णालयाकडे सध्या कोणतेही स्वयंसेवक नाहीत, परंतु डॉ. रणजित म्हणाले की अलीकडेच त्यांना परवानगी मिळाली आहे, आता स्वयंसेवक यायला सुरुवात होईल. 

चाचणीत यांचा समावेश - 

चाचणीत एकूण स्वयंसेवकांपैकी 20 टक्के अशा लोकांना घेतले जाईल ज्यांना आधीच हृदय, मूत्रपिंड, यकृत आणि इतर आजार आहेत. या चाचणीत 5 टक्के अग्रगण्य आरोग्य कर्मचारीदेखील सहभागी होतील.

महत्त्वाची बातमी : नवी मुंबईत कोरोनाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार, प्रवीण दरेकरांचे गंभीर आरोप

कोण भाग घेऊ शकेल

18 ते 60 वयोगटातील लोक या चाचणीमध्ये सहभाग घेऊ शकतात. स्वयंसेवकांना लस दिल्यानंतर त्यांचा 1 वर्षासाठी पाठपुरावा केला जाईल. पहिल्या इंजेक्शननंतर 28 दिवसानंतर लसीचा दुसरा डोस दिला जाईल.

ethic committee grants permission testing of made in india covaccine will be tested in mumbai on larger scale


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ethic committee grants permission testing of made in india covaccine will be tested in mumbai on larger scale