युरोपात घुमले वसईचे सुर, भावाच्या लग्नात बहिणीची अनोखी भेट

प्रसाद जोशी
Sunday, 18 October 2020

वसईत लग्न म्हणजे नुसता जल्लोष. नवरा-नवरीचं वर्णन करणारी, जावयाचा सासूरवाडीत कसे स्वागत झाले हे सांगणारी अनेक गाणी महिला लग्न सोहळ्यादरम्यान आवर्जुन गात असतात आणि त्याला साथ मिळते ती पारंपरिक वाद्यांची.

वसई : वसईत लग्न म्हणजे नुसता जल्लोष. नवरा-नवरीचं वर्णन करणारी, जावयाचा सासूरवाडीत कसे स्वागत झाले हे सांगणारी अनेक गाणी महिला लग्न सोहळ्यादरम्यान आवर्जुन गात असतात आणि त्याला साथ मिळते ती पारंपरिक वाद्यांची. मात्र वसईतील एका तरुणाचे युरोपमध्ये नुकतेच लग्न झाले. लॉकडाऊनमुळे त्याच्या लग्नाला वसईतील परिवाराला जाता आले नाही. त्यामुळे नवरदेवाच्या बहिणीने वसईच्या पारंपरिक बोलीभाषेत गाणं गायलं तर वडिलांनी ड्रमपेट वाजवत साथ दिली. त्याचा व्हिडीओ तयार करून नवरदेवाला पाठवला. या पारंपरिक गाण्याने आणि वाद्याने युरोपमधील लग्नाला वसईच्या संस्कृतीची सोनेरी झालर चढली. 

नक्की वाचा : नवरात्र उपवासात आहाराचा समतोल सांभाळा, प्रतिकार शक्ती टिकवण्याचा आहारतज्ज्ञांचा सल्ला

युरोपातील डेन्मार्क येथे ऍशली आल्मेडा नोकरीनिमित्त राहत आहे. त्याचा युरोप येथील मारिया गोरीगावा हिच्याशी गेल्या आठवड्यात विवाह सोहळा संपन्न झाला. मात्र लॉकडाऊन असल्याने भारतातून मुलाकडच्या वऱ्हाडी मंडळींना जाणे शक्‍य नव्हते. वसईच्या भुईगाव येथे राहणारे रॉक आल्मेडा, लॅरिसा आल्मेडा या वडील व बहिणीने पारंपरिक गाणं गायचं वाद्य वाजवायचं आणि वधूवराला आशीर्वाद द्यायचे, असा निश्‍चय केला. लॅरिसा हिने सुरेख आवाजात गाणं गायलं, तर रॉक यांनी ड्रमपेट वाजवून साथ दिली. गाण्यातून मुलाच्या सासूरवाडीत पाहुणचार कसा झाला, आई व मुलाचा संवाद, वधूचं देखणं रूप यासह लग्नातील दर्शन वसईच्या बोलीभाषेतून मांडण्यात आले आहे. 

महत्वाची बातमी मीरा भाईंदरच्या पाणी प्रश्नावर मंत्रालयात बैठक, पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक संतप्त

लॅरिसा ही इंडियन क्‍लासिकल म्युझिकचे शिक्षण घेत असून, डार्क लाईट सिनेमा तसेच चुलबुली चाची सीरियलसाठी गाणं गायली आहे, तर पियुष मिश्रा यांच्यासोबत देखील तिने गाणं गायले आहे. 

 

माझ्या विवाह सोहळ्यात घरच्यांना सहभागी होता आले नसले तरी त्यांनी पारंपरिक गाणी, वाद्याने पाठवलेला व्हिडीओ हा ते जवळच असल्याची जाणीव करून दिली. माझी पत्नी मारिया व तिच्या कुटुंबीयांना भाषांतर करून जेव्हा अर्थ सांगितला तेव्हा ते देखील खूप आनंदित झाले. 
ऍशली आल्मेडा, डेन्मार्क, युरोप. 

भावाचं लग्न, मात्र जाता आलं नाही म्हणून वसईची संस्कृती जपत युरोपला झालेल्या विवाहसोहळ्यासाठी बोलीभाषेतून गाणं गायलं व माझ्या वडिलांनी देखील साथ दिली व मनमुराद आनंद घेतला. 
- लॅरिसा आल्मेडा, वसई भुईगाव. 

वसईच्या नागरिकांशी माझं जवळच नातं आहे. युरोपमध्ये होणाऱ्या लग्नासाठी वसईतून घरातील सदस्य सामील होताना पारंपरिक पद्धत जपतात याचे मनापासून कौतुक आहे. माझ्या भावाने पाठवलेला व्हिडीओ पाहिल्यावर भारावून गेलो. बोलीभाषेत गोडवा आहे. सातासमुद्रापलीकडे पार उत्तर मुंबई, वसईची खरी भाषा दाखवत आहोत, ही अभिमानाची बाब आहे. 
- जयवंत वाडकर, ज्येष्ठ अभिनेते 
 

(संपादन : वैभव गाटे)

in europe marriage sister sang in the traditional dialect of Vasai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in europe marriage sister sang in the traditional dialect of Vasai