...यामुळे मंदावलाय नवी मुंबईचा वेग; नागरिक हैराण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

शहरात रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मलनिःसारण वाहिन्या, महानगर गॅसची पाईप लाईन, पाण्याची पाईप लाईन, भूमिगत विद्युतवाहिन्या टाकणे यांसारखी विकासकामे सुरू असल्याने, ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. मात्र, संथ गतीने सुरू असलेल्या या कामांमुळे नवी मुंबईकर हैराण झाले आहेत.

नवी मुंबई : शहरात रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मलनिःसारण वाहिन्या, महानगर गॅसची पाईप लाईन, पाण्याची पाईप लाईन, भूमिगत विद्युतवाहिन्या टाकणे यांसारखी विकासकामे सुरू असल्याने, ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. मात्र, संथ गतीने सुरू असलेल्या या कामांमुळे नवी मुंबईकर हैराण झाले आहेत. वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याने, त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ही बातमी वाचली का? विमानतळ प्रकल्पाग्रस्तांवर लाठीचार्ज

रबाळे-महापे औद्योगिक पट्टा, रबाले टी-जंक्‍शन, ऐरोली सेक्‍टर- ३ चा परिसर, कोपरखैरणे येथील ब्लू-डायमंड परिसर आदी ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. येथील रस्त्यांचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे, वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांना मार्गामध्ये बदल करावा लागत आहे. याशिवाय काँक्रीटीकरण सुरू असताना, त्या बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात येतो. उर्वरित अर्धा रस्ता हा वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येतो. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहने समोरासमोर येऊन वाहतूक कोंडी होत आहे. अनेकदा वाहनचालकांमध्ये शाब्दिक चकमकी होण्याच्या घटना देखील घडत आहेत. काही वाहनचालकांना, पादचाऱ्यांना गेल्या पावली मागे फिरावे लागत आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यांवरील वाळू, सिमेंटची कस तशीच पडून राहिल्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याच्या घटना देखील घडत आहेत. 

ही बातमी वाचली का? त्या आदिवासी दांम्पत्याला घराची लॉटरी

समन्वयाचा अभाव
पालिका, महावितरण, महानगर गॅस, रिलायन्स आदी कंपन्यांचा एकमेकांशी विचारविनिमय नसल्यामुळे रस्ते वारंवार खोदण्यात येतात. भूमिगत वीजवाहिन्या टाकलेल्या असताना, एखाद्या वेळी वीजपुरवठा खंडित झाला, तर ज्या ठिकाणी नादुरुस्त झाली आहे, ते शोधण्यासाठी रस्ता खोदण्यात येतो. तसेच रस्ते खोदल्यांनतर ते पूर्णपणे व्यवस्थित बुजवण्यात येत नसल्यामुळे रस्त्यांवर खड्डे तसेच राहतात. रस्त्यांची कामे सुरू असताना पदपथांवर रस्त्यांतील डेब्रिज टाकण्यात येते. परंतु काम झाल्यानंतर ते तसेच पडून राहते. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

ही बातमी वाचली का? नवी मुंबई राखण्यासाठी भाजपने आखला 'हा' प्लॅन

पालिकेकडून विविध प्रभागामध्ये विकासकामांसाठी खोदकाम करून ठेवण्यात आले आहे; मात्र ठेकेदारांकडून नियम पाळले जात नाहीत. अनेक ठिकाणी सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आल्या पावली पुन्हा जात आहे.
- सुशांत मालगावी, नागरिक.

ऐरोली, सेक्‍टर ३ व १९ ला जोडणाऱ्या रस्त्यामध्ये खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. मागील महिनाभरापासून येथे वाहतूक कोंडी होते. हे काम लवकर पूर्ण करावे. कामांसाठी वारंवर रस्ते खोदल्यामुळे, नाहक त्रास सहन करावा लागतो.
- अमय कुलकर्णी, नागरिक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excavated roads in Navi Mumbai cause headaches