कंत्राटदारांवर फडणवीस सरकारची मेहरबानी; कॅगचा ठपका; बांधकाम आणि जलसंपदा विभागात उधळपट्टी 

कंत्राटदारांवर फडणवीस सरकारची मेहरबानी; कॅगचा ठपका; बांधकाम आणि जलसंपदा विभागात उधळपट्टी 


मुंबई ः तत्कालीन मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस सरकारने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागात मनमानीपणे एका कंत्राटदाराचे काम काढून घेत दुसऱ्या कंत्राटदाराला वाढीव दराने कंत्राट दिल्याबाबत आक्षेप घेत यामुळे पावणेतीन कोटी रुपयांची उधळपट्टी झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, नियोजन-भूसंपादन न करताच प्रत्यक्ष काम सुरू केल्याने जलसंपदा विभागाच्या कंत्राटात 211 कोटी रुपयांची उधळपट्टी झाल्याचे ताशेरे कॅगच्या अहवालात ओढले आहेत.

गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कॅगच्या अहवालात तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील महामंडळांतील आर्थिक गैरकारभारावर कॅगने ताशेरे ओढले होते.  सध्या सुरू असलेल्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात गतवर्षांतील आर्थिक क्षेत्रावरील कॅगचा अहवाल मांडण्यात आला. त्यामधे तत्कालीन फडणवीस सरकारमधील सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या विभागातील आर्थिक गैरकारभारावर कठोर ताशेरे ओढले आहेत. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने शीव-पनवेल महामार्गाच्या कामाचे काही टप्प्यातील काम एका कंत्राटदाराकडून काढले. मात्र निविदा न काढताच दुसऱ्या कंत्राटदारांला वाढीव दराने हे काम दिले. यामुळे सरकारचे 2 कोटी 86 लाख रूपये अकारण खर्च झाल्याचा ठपका कॅगने अहवालत ठेवताना हे नुकसान टाळता आले असते अशी भावना व्यक्त केली आहे. दरम्यान, पहिल्या कंत्राटदाराकडून काम काढून घेण्यापूर्वीच दुसऱ्या कंत्राटदाराला काम सुरू करण्याचे सांगितले, असे निरीक्षण कॅगने नोंदवले आहे.

सिंचन प्रकल्पांच्या कंत्राटातही मोठी उधळपट्टी  
अंजनी मध्यम प्रकल्पाची उंची वाढवण्याचे काम भूसंपदान न करताच सुरू केले. त्यामुळे  32.38 कोटी रुपयांचा खर्च वायफळ झाला. तर वाघूर प्रकल्पातही 4.38 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. माजलगाव उपसा सिंचन योजनेत ऑक्टोबर 2015 मध्ये संबधित कंत्राटदाराला 117 कोटी रुपये दिले. पण सदोष नियोजनामुळे 2019 मध्ये देखील या प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही, असे कॅगने स्पष्ट केले आहे.  आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य असूनही मराठवाड्यातील उणकेश्वर प्रकल्पात 55 कोटी 22 लाखांची उधळपट्टी केल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत.

तूर खरेदीत उदासीनता.. 
राज्यात 2016 मध्ये तुरीचे उत्पादन सरासरीपेक्षा पाचपट झाले. त्यामुळे बाजारातील भाव पडले. तुरीच्या उत्पादनात प्रचंड वाढ होणार हे माहित असूनही सहकार व पणन विभागाने खरेदीत हस्तक्षेप करण्यास दिरंगाई केली. खरेदी योजना जाहीर केल्यानंतरही अंमलबजावणी बाबत मात्र उशीर केला. याशिवाय शेतकऱ्यांचे पैसे देण्यातही ततकालीन सरकाची उदासीनता दिसली, अशी खंत कॅगने व्यक्त केली आहे.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com