शेअरबाजारात घसरण; सेन्सेक्स 300 अंशांनी पडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market

शेअरबाजारात घसरण; सेन्सेक्स 300 अंशांनी पडला

मुंबई : जागतिक प्रतिकूल वातावरणामुळे आज भारतीय शेअरबाजारांमध्ये जोरदार नफावसुली झाली. त्यामुळे सेन्सेक्स 300 अंशांनी तर निफ्टी 118 अंशांनी घसरला. दिवसअखेर सेन्सेक्स 55,329 अंशांवर तर निफ्टी 16,450 अंशांवर स्थिरावला.

हेही वाचा: कोकण मंडळाची सोडत यंदा प्रथमच ठाण्यात ?

गेले काही दिवस जागतिक तसेच भारतीय शेअर बाजारही सर्वकालिक उच्चांकावर होते. मात्र नंतर चीनमध्ये आयटी व धातू उद्योगांवर लादलेली नियंत्रणे, चीनचा विकास कमी होण्याची शंका, अमेरिकी फेड ने कोरोनाशी संबंधित पॅकेज कमी करण्याचे दिलेले संकेत, डेल्टा प्लस ची वाढती रुग्णसंख्या, त्यातच अफगाणिस्तानमधील गोंधळ या कारणांमुळे जागतिक शेअरबाजारांमधील वातावरण बदलले. आजही अमेरिकी, युरोपीय व आशियाई बाजार घसरलेलेच असल्याने भारतीय शेअर बाजारही सकाळपासूनच पडलेले होते.

आज डॉलर मजबूत झाल्यानेही आशियाई बाजारांवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. तर जागतिक वायदे बाजारातील लोहखनिजाच्या भावात बदल झाल्याने धातू उद्योग कंपन्यांच्या समभागांचे भाव घसरले. इतके दिवस वाढ दाखवीत असलेला टाटा स्टील चा शेअर आज टक्केवारीच्या हिशोबात सर्वात जास्त म्हणजे 8.27 टक्के (124 रुपये) पडून 1,375 रुपयांवर स्थिरावला. त्यासह जेएसडब्ल्यू स्टील, हिंदाल्को यांच्या शेअरचे भावही कमी झाले.

हेही वाचा: सीबीआयला कागदपत्रांसाठी नकार कशाला, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

डॉ. रेड्डीज लॅबचा शेअर 131 रुपयांनी घसरून 4,554 रुपयांवर आला. कोटक बँकेचा भाव 46 रुपयांनी पडल्याने 1,703 रुपयांवर गेला तर 38 रुपयांनी पडलेला एलअँडटी चा शेअरही 1,593 रुपयांपर्यंत गडगडला. एअरटेल (बंद भाव 612 रु.), बजाज ऑटो (3,750), अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स, महिंद्र आणि महिंद्र यांचेही भाव कमी झाले.

हेही वाचा: 'एसआयपी'च्या यशाचे रहस्य

सेन्सेक्समधील प्रमुख 30 शेअरपैकी आज फक्त आठ शेअरचे भाव वाढले होते तर उरलेल्या 22 शेअरचे भाव पडले. हिंदुस्थान युनिलीव्हर 133 रुपयांनी वाढून 2,617 रुपयांवर तर एशियन पेंट 109 रुपयांनी वधारून 3,112 रुपयांवर गेला. 642 रुपयांनी वाढलेला नेस्ले चा भाव 19,552 पर्यंत पोहोचला. बजाज फायनान्सही 112 रुपयांनी (बंद भाव 6,656 रु.) वाढला. एचडीएफसी व एचडीएफसी बँक, मारुती व आयटीसी यांच्या भावातही किरकोळ वाढ झाली.

आजचे सोन्याचांदीचे भाव:

  • सोने - 47,400

  • चांदी - 62,200

Web Title: Falling Stock Marketthe Sensex Fell 300 Points

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..