मेट्रोसह अठरा प्रकल्पांचे भवितव्य ठरणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

वृक्ष कटाईविरोधात दाखल याचिकांवर उच्च न्यायालयात मंगळवारी निकाल!

मुंबई ः वडाळा-कासारवडवली मेट्रो- ४ प्रकल्पामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील झाडांची कटाई करण्याला विरोध करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली असून या प्रकरणाचा निकाल न्यायालय मंगळवारी देण्याची शक्‍यता आहे. मेट्रोसह ठाण्यातील १८ प्रकल्पांचे भवितव्य या निकालावर अवंलबून आहे. ठाणे पालिकेने केलेल्या झाडांच्या पुनर्लागवडीची पाहणी करण्याची सूचना न्यायालयाने पर्यावरणप्रेमी याचिकादारांना केली आहे.

हे सुद्धा वाचा आधी योग्य मोबदला, मगच बुलेट; ट्रेन शेतकरी झाले आक्रमक

मेट्रो चार प्रकल्पासह ठाण्यातील रस्तारुंदीकरण, रस्ताबांधणी, गृहनिर्माण आदी प्रकल्पांमध्ये करण्यात येणाऱ्या प्रस्तावित झाडे कटाईबाबत न्यायालयात दाखल दोन जनहित याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे पूर्ण झाली. यावेळी याचिकादारांनी केलेल्या दाव्यांचे एमएमआरडीए आणि महापालिकेने खंडन केले. झाडांच्या कटाईची परवानगी नियमांनुसार झाली असून जिओ मॅपिंगही केले असल्याचे स्पष्ट करत, त्यांची पुनर्लागवडही केल्याचे एमएमआरडीने सांिगतले.

पुनर्लागवड पाहणी करा; पर्यावरणप्रेमींना सूचना
रेल्वेवाहतुकीवर पडणारा ताण पाहता आणि कसारा-आसनगाव आदी लांबहून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी पर्यायी वाहतूक उपलब्ध होणे आवश्‍यक आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. याचिकादारांनी हवे असल्यास पुनर्लागवड केलेल्या कामाची पाहणी करावी आणि आवश्‍यकता वाटल्यास सूचना कराव्यात, असेही न्यायालयाने सुचविले.

मेट्रो २ : २९२ झाडांचे पुनर्रोपण
मुंबई : मेट्रो २ ब मार्गासाठी ५२ झाडे तोडण्यात येणार असून, २९२ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. एमएमआरडीएने झाडांच्या पुनर्रोपणासाठी वडाळा येथील जागेची पाहणी केली. कल्याण शिळफाटा परिसरातही झाडांची पुनर्लागवड करण्यात आली आहे. एमएमआरडीएने इंडिया फार्म्स प्रा. लि.कडे मालवणी गाव आणि आक्‍सा येथे झाडांचे पुनर्रोपणाठी परवानगी मागितली आहे. ११७ एकर जागेवर २००० झाडांचे पुनर्रोपण करता येईल, असेही सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fate of eighteen projects, including the metro, will take place on Tuesday