अश्रू अन्‌ निर्धारही : चौथ्या वेळीही घर न लागलेल्या गिरणी कामगारांची व्यथा

gorakh mulik
gorakh mulik

मुंबई : "1982 च्या संपानंतरही चार वर्ष मुंबईत तग धरून होतो. गिरणं आज नक्की सुरु होईल, या आशेवर रोज गेटजवळ जायचो. चार वर्षात या रोजच्या वारीत खंड पडला नाही; पण ज्या मुंबईने वाढवलं, कमावयाला शिकवलं, त्या मुंबईत नंतर निभाव लागत नव्हता, म्हणून नाईलाजाने गावी परतलो. पुन्हा घर मिळेल म्हणून चार वेळा प्रयत्न केले; पण आजही पदरी निराशाच आली. मुंबईत हक्काच्या घराचं पुन्हा स्वप्नच राहीलं, अशी खंत व्यक्त करताना पुन्हा मुंबईत येईलच', असा निर्धार 64 वर्षीय गोरख गुळीक यांनी व्यक्त केला. 

गोरख गुळीक यांचा जन्म मुंबईचा. त्यांचे निम्मे आयुष्य भाड्याच्या घरातच गेले. आपली व्यथा मांडताना ते म्हणाले की, "1971 मध्ये गिरणगावातील एका मिलमध्ये चिटकलो. 10-11 वर्ष सुखाचे गेले; मात्र 1982 चा संप झाला अन्‌ गिरणीत पाऊल ठेवता येत नव्हतं. गिरणी आज सुरु होईल,उद्या होईल, या आशेवर रोज गेटवर जायचो. पण, चार वर्षात काहीच झालं नाही. या काळात संसाराची घडी विस्कटू लागली. घरातलं एक-एक भांड विकलं. भाडही द्यायचं होतं. त्यामुळे नाईलाजाने सांगली जिल्ह्यातील गावी आलो. पण, मुंबईत कधी ना कधी तरी घर घेणार हे स्वप्न होतंच. काही वर्षांपूर्वी गिरणी कामगारांना घर देण्याची घोषणा झाली. आतापर्यंत चार लॉटऱ्या झाल्या; पण एकाही लॉटरीत घर लागलं नाही,' असा प्रवास गुळीक यांनी त्यांच्या लटपत्या शब्दांनी मांडला. 

आयुष्यात फक्त गिरणीत काम केलं होतं. दुसरे कोणतेही काम काही जमणार नाही, हे माहित असल्याने गावी गेल्यावर दोन वर्षांत गवंडी काम शिकलो. तेव्हा पासून आतापर्यंत तेच करतोय. त्या कामाच्या जीवावर मुलांना वाढवलं. पण, मुंबईची ओढ कमी होत नव्हती. त्यासाठी लॉटरीत अर्ज करतोय; पण पदरी निराशा पडते. आता पुन्हा गावी जाणार या जोडीदारणी सोबत,' असे सांगत त्यांनी आपल्या पत्नीकडे बोट दाखवलं. जाता जाता पुढच्या लॉटरीलाही भेटूया, असे सांगत मुंबईत परत येण्याचे स्वप्न अजून काही संपलं नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले. 

परत येणार.... 
गुळिक यांच्या प्रमाणे कोल्हापूरहून आलेले सनप्पा संके यांना चौथ्या वेळेसही घराची लॉटरी लागली नाही. सनप्पा हे 1980च्या दशकात मुंबईत मिलमध्ये नोकरीला लागलेले. 1982 च्या संपानंतर पुन्हा गावी परतावं लागलं. मुंबईत घर होईल, या आशेवर आता चौथ्या वेळेस लॉटरी भरली; पण, नशिबच नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त करत पुढच्यावेळी पुन्हा अर्ज करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com