मराठी सिनेसृष्टीला धक्का; चित्रपट, नाट्य दिग्दर्शक गिरीश साळवी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

चित्रपट व टीव्हीपेक्षा नाटकांमध्ये ते अधिक रमले. बुद्धिबळ आणि झब्बू व खेळीमेळी अशी त्यांची काही नाटके लोकप्रिय झाली. विजय तेंडुलकरलिखित 74 पावसाळ्यांचा जमाखर्च हा दोन तासांचा एकपात्री प्रयोगही त्यांनी केला.

मुंबई : अभिनेता, नाट्य दिग्दर्शक व चित्रपट निर्माता गिरीश साळवी (55) यांचे सोमवारी सायंकाळी वरळी येथील घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

महत्वाची बातमी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी, आठवड्याभरात मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर 'इतका' वाढला

वरळीतील सूरप्रवाह या संस्थेपासून गिरीश साळवी यांचा नाट्यप्रवास सुरू झाला. अजित भगत आणि विनायक पडवळ हे त्यांचे सुरुवातीचे गुरू. गिरीश यांनी काही एकांकिकांमध्ये काम केले आणि काही एकांकिकांचे दिग्दर्शनही केले. चित्रपट व टीव्हीपेक्षा नाटकांमध्ये ते अधिक रमले. बुद्धिबळ आणि झब्बू व खेळीमेळी अशी त्यांची काही नाटके लोकप्रिय झाली. विजय तेंडुलकरलिखित 74 पावसाळ्यांचा जमाखर्च हा दोन तासांचा एकपात्री प्रयोगही त्यांनी केला.

हे ही वाचा : रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि संजय राऊतांमध्ये 'ट्वीट वार'! वाचा बातमी...

मृण्मयी, दिशा अशा काही मालिकांतही त्यांनी काम केले. कुमारी गंगूबाई नाॅनमॅट्रिक या मालिकेचे शीर्षकगीत त्यांनी लिहिले होते. नाटकांत आणि टीव्ही मालिकांत काम करता करता ते चित्रपटांतही काम करू लागले. राजेश देशपांडे दिग्दर्शित धुडगूस या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आणि त्यात कामही केले. किशोर बेळेकर दिग्दर्शित येडा या चित्रपटाचे ते एक निर्माते होते. समांतर रंगभूमी ते व्यावसायिक रंगभूमी, टीव्ही मालिका ते चित्रपट अभिनेता आणि चित्रपटांचा निर्माता अशी त्यांची कारकीर्द होती. काही वर्षांपासून आजारी असलेल्या गिरीश साळवी यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. सोमवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Film, play director Girish Salvi passes away, read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Film, play director Girish Salvi passes away, read full story