विद्यार्थांविना शाळांमध्ये झेंडावंदन; कोरोनामुळे मोजक्याच शिक्षकांची उपस्थिती

तेजस वाघमारे
Saturday, 15 August 2020

  • कोरोनामुळे यंदा प्रथमच शाळांमध्ये विद्यार्थ्यांविना झेंडावंदन कार्यक्रम पार पडला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच असे घडल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
  • दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभात फेरी, झेंडावंदन, दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, भाषणे आदी कार्यक्रमांची रेलचेल असते. मात्र, यंदा असे काहीच चित्र नव्हते.

मुंबई : कोरोनामुळे यंदा प्रथमच शाळांमध्ये विद्यार्थ्यांविना झेंडावंदन कार्यक्रम पार पडला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच असे घडल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभात फेरी, झेंडावंदन, दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार, भाषणे आदी कार्यक्रमांची रेलचेल असते. मात्र, यंदा असे काहीच चित्र नव्हते. तरीही शाळांनी ऑनलाइन भाषणे आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात रंगत आणण्याचा प्रयत्न केला.

ही बातमी वाचली का? मुंबईची लाइफलाईन लोकल ट्रेन कधी होणार सुरु? बड्या मंत्र्यानं दिलं 'हे' उत्तर

कोरोनामुळे अद्यापही शाळा प्रत्यक्ष सुरू झालेल्या नाहीत. यामुळे शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन काही शिक्षकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. झेंडावंदन कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळेतील कर्मचारी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे पाहुणे म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धा, कोरोनावर मात करणारी व्यक्ति आणि शहीद जवानांच्या कुटुंबातील नागरिकांना कार्यक्रमासाठी बोलविण्यात आले होते. 

हेही वाचा : ठाणेकर! स्वातंत्र्यदिनी 'ही' खास बातमी तुमच्यासाठी, नक्की वाचा

कार्यक्रमात निरसता
शाळेचे मैदान आणि सर्व परिसर सजवण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी एकत्रित मेहनत करतात. मात्र, यंदाच्या कार्यक्रमात विद्यार्थीच नसल्यामुळे खाऊ वाटप, विविध विषयांवर भाषणे आणि विद्यार्थ्यांचा सत्कार अशी कार्यक्रमे झाली नाहीत. शाळेतील झेंडावंदन सरकारी कार्यालयातील कार्यक्रमाप्रमाणे वाटला. विद्यार्थ्यांअभावी कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे शोभा नव्हती, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली.
------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flag hoisting in schools without students; The presence of few teachers due to corona