फ्लेमिंगोंचा निवारा 20 टक्‍क्‍यांवर; संरक्षित क्षेत्राबाबत पक्षी निरीक्षकांमध्ये भीती 

कृष्ण जोशी
Monday, 12 October 2020

महामुंबई परिसरात होत असलेल्या विकासाचा परिणाम फ्लेमिंगोंच्या आश्रयस्थानांवर होत आहे.

मुंबई ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी टाकलेला भराव आणि जेएनपीटी बंदराचा विस्तार यामुळे महामुंबई परिसरातील फ्लेमिंगो पक्ष्यांचे संरक्षित क्षेत्र आता जेमतेम 20 टक्के इतकेच उरल्याची खंत पक्षी निरीक्षकांनी ई परिसंवादात व्यक्त केली. 

जागतिक स्थलांतरित पक्षी दिनी येथे वेबिनार आयोजित केला होता. पाणथळ जागा नष्ट झाल्यामुळे फ्लेमिंगोंसाठी आता छोट्या-छोट्या जागाच उरल्या आहेत, असे सांगतानाच कमी होत चाललेल्या फ्लेमिंगोंच्या रक्षणासाठी या वेळी सूचनाही करण्यात आल्या. जैवविविधतेच्या रक्षणासाठी मुंबईकरांनी स्थापन केलेल्या मिनिस्ट्री ऑफ मुंबईज मॅजिक या संस्थेच्या मोहिमेंतर्गत हा वेबिनार झाला. पर्यावरणवादी पत्रकार बहार दत्त, वन्यजीवविषयक चित्रपटनिर्मात्या अशीमा नरेन, वीरेंद्र तिवारी, ऋत्विक दत्ता, वनशक्तीचे स्टॅलीन दयानंद आदी मान्यवर यात सहभागी होते. 

दिवाळीनंतरही शाळा सुरू करणे अशक्‍यच; शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची माहिती - 

महामुंबई परिसरात होत असलेल्या विकासाचा परिणाम फ्लेमिंगोंच्या आश्रयस्थानांवर होत आहे. नवी मुंबई विमानतळ व जेएनपीटीचा विस्तार यासाठी दोन हजार हेक्‍टर पाणथळ जागेवर भराव घालण्यात आल्याने फ्लेमिंगोंची 80 टक्के आश्रयस्थाने कमी झाली. आता ठाणे खाडी तसेच तेथील फ्लेमिंगो अभयारण्य हे त्यांचे प्रमुख आश्रयस्थान उरले आहे. या परिसरातील तिवरांचे जंगल, गवताळ भाग, जलाशय व शेजारचा मैदानी भाग यांचाही समावेश केला पाहिजे, असे स्टॅलिन दयानंद म्हणाले. 
महामुंबई परिसरात 1980 पासून हजारो फ्लेमिंगो येत असत, तेव्हा या परिसरात त्यांच्या मुक्कामासाठी आदर्श परिस्थिती होती; पण आता त्यांची आश्रयस्थाने आक्रसली आहेत. बांधकामांमुळे पाणथळ जागा नष्ट होत असल्याने ही परिस्थिती आली आहे. उरण परिसरातील पाणथळ जागेत पूर्वी हजारो फ्लेमिंगो येत असत; पण आता तेथे नवी मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी भराव टाकला आहे, तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसाठीही तिवरांची जंगले तोडावी लागली. खाजणही नष्ट होत आहे. त्यामुळे शिवडी किनाऱ्यावरील फ्लेमिंगोंचा निवाराही संपुष्टात येईल, अशी भीतीही व्यक्त केली आहे. 

आरे आंदोलनातील पर्यावरणवाद्यांचे गुन्हे मागे घेण्यात येणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती 

बुलेट ट्रेनचा परिणाम शक्‍य 
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठीही ठाणे खाडीतील फ्लेमिंगो अभयारण्यातून बांधकाम होणार आहे. अशा विकासामुळे पाणथळ जमिनी व तिवरे नष्ट होतील आणि फ्लेमिंगोंची संख्याही कमी होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. हे टाळण्यासाठी आहेत त्या तिवरांचे तसेच पाणथळ जागांचे संवर्धन करावे. तिवरांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले. उरण शहरातला कचरा बोरीपाखाडीत टाकण्यास मनाई करणारा आदेश तिवरे संरक्षण समितीने उरण नगरपालिकेला दिला आहे. अशाच उपाययोजना अन्यत्र कराव्यात, असेही सुचविण्यात आले. 

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flamingos shelter at 20 percent Fear among bird watchers about protected areas