मुंबईला आजपासून परदेशी प्रवाशांचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

आखाती देशांत अडकलेले भारतीय प्रवासी गुरुवारपासून (ता. १९) मुंबईत येण्याची शक्‍यता आहे. मुंबई विमानतळावर ३१ मार्चपर्यंत रोज २००० प्रवासी येतील, असा अंदाज आहे.

मुंबई : आखाती देशांत अडकलेले भारतीय प्रवासी गुरुवारपासून (ता. १९) मुंबईत येण्याची शक्‍यता आहे. मुंबई विमानतळावर ३१ मार्चपर्यंत रोज २००० प्रवासी येतील, असा अंदाज आहे. त्यासाठी महापालिकेने विमानतळावर अतिरिक्त वैद्यकीय पथक नेमले असून, कोरोनाच्या संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी अंधेरी क्रीडा संकुल आणि बोरिवलीतील प्रशिक्षण केंद्रात विलगीकरण कक्ष तयार करण्याचा विचार सुरू आहे.

महत्वाची बातमी ः  वृत्तपत्रामुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही!

आखाती देशांतून दररोज किमान २००० प्रवासी मुंबई विमानतळावर उतरणार आहेत. त्यासाठी वैद्यकीय पथकांची संख्या वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत एक डॉक्‍टर आणि दोन पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली १० पथके प्रवाशांची तपासणी करत होती. आता तपासणी पथकांची संख्या १३ पर्यंत वाढवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

महत्वाची बातमी ः कोरोनाची एसटी प्रवाशांना धास्ती

कस्तुरबा रुग्णालयात सध्या ६७ संशयित रुग्ण दाखल असून, तेथे १०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात १० रुग्ण असून, तेथे ३०० खाटांची तयारी करण्यात आली आहे. 

काय करणार?
 विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांची ए, बी, सी अशा तीन गटांत विभागणी.

 • ए गट : कोरोनासदृश लक्षणे दिसणाऱ्यांची रुग्णालयात दाखल करून तपासणी.
 • बी गट : कोरोनाची लक्षणे नसलेल्या; मात्र रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह व अन्य आजार असलेल्या व्यक्ती देखरेखीखाली रुग्णालयात.
 • सी गट : कोणतीही लक्षणे व आजार नसलेल्या प्रवाशांना घरातच एकांतवासात राहण्याचा सल्ला किंवा विमानतळानजीकच्या ठरलेल्या हॉटेलात स्वखर्चाने राहण्याची परवानगी.    

खासगी रुग्णालयेच ठरवणार दर
खासगी रुग्णालयेच दर निश्‍चित करणार आहेत; त्यात महापालिका हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगण्यात आले. महापालिकेने सार्वजनिक रुग्णालयांत विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. खासगी रुग्णालयात जाण्याची इच्छा असलेल्यांना तशी मुभा देण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

महत्वाची बातमी ः 'हा' रिपोर्ट वाचा आणि कोरोनाबद्दलची भीती मनातून काढून टाका

खासगी रुग्णालयांतील खाटा

 •   जसलोक (पेडर रोड) : ५
 •   एच. एन. रिलायन्स (गिरगाव) : २
 •   हिंदुजा (माहीम) : २०
 •   कोकिळाबेन (अंधेरी) : १७ 
 •   रहेजा (माहीम) : १२
 •   गुरू नानक (वांद्रे) : २
 •   सेंट एलिझाबेथ (मलबार हिल) : २
 •   बॉम्बे (मरिन लाईन्स) : ४
 •   लीलावती (वांद्रे) : १५
 •   फोर्टिस (मुलुंड) : २० 
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: foreign peoples will arrive in mumbai from today