IPL सामन्यांवरील सट्टेबाजीप्रकरणी मुंबईच्या माजी रणजीपटूला अटक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

यापूर्वी मॅच फिक्सिंगप्रकरणातही त्याचे नाव आले होते.

मुंबई- इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) सामन्यांवर सट्टेबाजी केल्याप्रकरणी माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिसला अटक करण्यात आली आहे. कॅनडामध्ये जन्मलेल्या रॉबिन मॉरिसने मुंबई आणि ओडिशाकडून रणजी सामने खेळले. मुंबईतील वर्सोवा पोलिसांनी सट्टा लावण्याच्या आरोपाखाली रॉबिन मॉरिसला अटक केली आहे. 

पोलिसांनी 44 वर्षीय रॉबिनबरोबर इतर दोघांना सट्टेबाजीच्या आरोपाखाली अटक केली आहे. रॉबिनने प्रथमश्रेणीचे 42 सामने खेळले त्याशिवाय मुंबई आणि ओडिशाकडून 51 देशांतर्गत एकदिवसीय सामने खेळले आहेत. हे सर्व सामने त्याने वर्ष 1995 ते 2007 दरम्यान खेळले आहेत. रॉबिनने बहुचर्चित आयसीएलमध्येही सामने खेळले आहेत. तो मुंबई चॅम्पकडून खेळत असत. 

हेही वाचा- मुंबईत केवळ सौम्य आवाजाच्या फटाक्यांना परवानगी, पालिकेची नवी नियमावली जाहीर

पोलिसांनी सांगितले की, वर्सोवा येथे रॉबिनच्या घरी सट्टेबाजी सुरु असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर तिथे छापा मारण्यात आला. त्यावेळी यात तिघांना अटक करण्यात आली. यामध्ये रॉबिनचाही समावेश आहे. सट्टा घेण्यात रॉबिनही सहभागी होता, असे पोलिसांनी सांगितले. 

हेही वाचा- कोठडीत असताना अर्णब गोस्वामी मोबाईलवरुन सोशल मीडियावर लाईव्ह, चौकशी सुरु

त्याच्या फ्लॅटवरुन लॅपटॉप आणि मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. तिघांवर आयपीसी आणि गॅम्बलिंग एक्टनुसार कारवाई करण्यात येणार आहे. 

हेही वाचा- मुंबईत तापाच्या रुग्णांत वाढ; थंडीमुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

यापूर्वी 2019 मध्ये अल जझिरा टीव्हीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये रॉबिनचे नाव समोर आले होते. त्यावेळी तो मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचा आरोप करण्यात आला होता. मागील वर्षी एका लोन एजंटचे अपहरण केल्याचा त्याच्यावर आरोप होता. दोन लाखांसाठी रॉबिनने अपहरण केल्याचे सांगितले जाते. त्यावेळी याप्रकरणी इतर चार जणांनाही अटक करण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former cricketer robin morris arrested ipl betting mumbai ranji trophy