पाम बीच मार्गावर वाहनाच्या धडकेत कोल्हा जखमी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 February 2020

सीवूडस एनआरआय कॉम्प्लेक्‍सजवळील पाम बीच मार्गावर मंगळवारी (ता. 4) रात्री सव्वाआठच्या सुमारास कोल्हा पाहण्यास मिळाला. मात्र चुकून रस्त्यावर आलेल्या या कोल्ह्याला दुचाकीची धडक लागून तो जखमी झाला.

नवी मुंबई : सीवूडस एनआरआय कॉम्प्लेक्‍सजवळील पाम बीच मार्गावर मंगळवारी (ता. 4) रात्री सव्वाआठच्या सुमारास कोल्हा पाहण्यास मिळाला. मात्र चुकून रस्त्यावर आलेल्या या कोल्ह्याला दुचाकीची धडक लागून तो जखमी झाला. या घटनेविषयी माहिती मिळताच प्राण्यांसाठी काम करणाऱ्या "भूमी जीवदया', "रेस्किनक असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर' (आरएडब्लूडब्लू) या संस्थांसह वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही तातडीने धाव घेतली. यापूर्वीही ऐरोलीत भरवस्तीत कोल्ह्याचे दर्शन झाले होते.

ही बातमी वाचली का? विमानतळ प्रकल्पाग्रस्तांवर लाठीचार्ज

नौदलाचे लेफ्टनंट जनरल गौतम कुमार पाम बीच मार्गावरून जात असताना, त्यांना एका दुचाकीला कोल्हा धडकल्याचे दिसले. त्याबरोबर त्यांनी वन विभागाला या घटनेबाबत माहिती दिली. घटनास्थळी वनाधिकारी एच. बी. करंडे, क्षेत्रीय वनाधिकारी सुरेंद्र पाटील यांनी धाव घेतली. जखमी प्राण्यांवर प्रथमोपचार करणाऱ्या भूमि जीवदया संस्थेचे सागर सावला आणि आरएडब्लूडब्लूच्या पथकालाही त्या ठिकाणी बोलावण्यात आले. दरम्यान, जखमी कोल्हा पाम बीच मार्गालगतच्या (डीपीएस समोरच्या) झुडपात लपून बसल्याने अंधारात त्याला शोधणे वन अधिकाऱ्यांना कठीण जात होते. जवळपास 15 ते 20 मिनिटांच्या शोधमोहिमेनंतर जखमी कोल्हा त्यांच्या हाती लागला. त्यानंतर त्याला प्रथमोपचारासाठी भूमी जीवदयाच्या दवाखान्यात नेण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्याला आरएडब्लूडब्लूचे पवन शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. कोल्ह्याच्या शोधमोहिमेत लेफ्टनंट जनरल गौतमकुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे भूमी जीवदयाचे सागर सावला यांनी सांगितले. कोल्ह्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर पुढील उपचार, तपासणी सुरू असल्याची माहिती पवन शर्मा यांनी दिली. 

ही बातमी वाचली का? प्रवाशी म्हणतायेत, एसी लोकल नको रे बाबा!

विद्यार्थ्याला अजगराचा दंश 
पाम बीच मार्गाला लागून असलेल्या खारफुटीत लांडगा, कोल्हा, मुंगूस; तसेच विविध प्रजातींचे पक्षी देखील आढळतात. काही दिवसंपूर्वीच येथील डीपीएस शाळेतील एका विद्यार्थ्याला अजगराने दंश केल्याची घटनाही घडली होती. त्यानंतर आता कोल्हा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

लेफ्टनंट गौतम कुमार यांनी या घटनेबाबत कळवल्यानंतर लगेचच घटनास्थळी धाव घेतली. ठाणे वन परिमंडळचे वनक्षेत्रपाल एन. बी. मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचावकार्य करण्यात आले. कोल्ह्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यावर उपचार सुरू आहेत. 
- एच. बी. करंडे, वनाधिकारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fox injured in vehicle collision on Palm Beach Road