नाट्यकर्मींची उपासमार, नाट्य परिषद उभारणार मदतनिधी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेले महिनाभर देशाप्रमाणे नाट्यसृष्टीही लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन अजून किती काळ असेल, याबाबत अनिश्चितता आहे. लॉकडाऊन संपले तरी प्रत्यक्ष रंगमंचावर नाटक येण्यास बराच काळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाट्य व्यवसायावर अवलंबून असलेल्या कलाकार, रंगमंच कामगारांवर उपासमारीची वेळी येणार आहे. याच पार्श्वभूमीवर नाट्य परिषद मदतनिधी उभारण्यासाठी पुढे सरसावली आहे.

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेले महिनाभर देशाप्रमाणे नाट्यसृष्टीही लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन अजून किती काळ असेल, याबाबत अनिश्चितता आहे. लॉकडाऊन संपले तरी प्रत्यक्ष रंगमंचावर नाटक येण्यास बराच काळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाट्य व्यवसायावर अवलंबून असलेल्या कलाकार, रंगमंच कामगारांवर उपासमारीची वेळी येणार आहे. याच पार्श्वभूमीवर नाट्य परिषद मदतनिधी उभारण्यासाठी पुढे सरसावली आहे.

वाचा सविस्तर : कोरोनाच्या 83 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत

लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभरात नाट्य व्यवसायाचे 25 कोटींचे नुकसान झाले. तर आगामी काळात 100 कोटीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन 10 कोटी रुपयांचा नाट्यकर्मी मदत निधी तातडीने निर्माण करावा लागेल.

हा निधी उभारण्यासाठी दानशूर संस्थांनी व व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन नाट्य परिषदेने केले आहे. याबाबत नुकताच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली नाट्य निर्माता, कलावंत, रंगमंच कामगार संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. 

सद्यस्थितीत नाट्य व्यवसायावर अवलंबून असलेल्या कलाकार, रंगमंच कामगारांवर उपासमारीची वेळी आहे. तसेच नाट्य निर्मातेही आर्थिक संकटात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर नाट्यनिर्माते, कलावंत आणि रंगमंच कामगारांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून 50 लाखांची मदत करण्यात येणार आहे. नाट्यनिर्माता संघातर्फे नाट्य निर्मात्यांना साहाय्य करण्यात येणार आहे, असे निर्माता संघाचे कार्यवाह राहूल भंडारे यांनी सांगितले. 

वाचा सविस्तर : सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंचा बोलबाला

नाट्य व्यवसाय पुन्हा सक्षमपणे सुरू होण्यासाठी प्रेक्षकांची साथ आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन नियोजन करावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली. 
या बैठकीत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे संतोष कणेकर, सुशांत शेलार, मंगेश कदम, नाट्य निर्माते संघाचे अनंत पणशीकर, ज्ञानेश महाराव, रंगमंच कामगार संघटनेचे रत्नाकांत जगताप, नाट्य निर्माते दिगंबर प्रभू, संतोष कोचरेकर, उदय धुरत आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fund to set up Natya Parishad