मुंबईकरांनो! गणपतीला गावी जायचंय... मग त्याआधी गावकऱ्यांचे नियम जाणून घ्या

मुंबईकरांनो! गणपतीला गावी जायचंय... मग त्याआधी गावकऱ्यांचे नियम जाणून घ्या

मुंबई- कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव सर्वाधिक झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊनच्या काळात अनेक उत्सव रद्द करण्यात आले. त्यातच आता गणेशोत्सव जवळ येत आहे. गणेशोत्सवाला कोकणात जाणं ही मुंबईकरांची परंपरा आहे. अनेक चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. मात्र कोरोना व्हायरसचा धसका घेतलेल्या गावकऱ्यांनी मुंबईकरांसाठी एक नवा नियम काढला आहे. 

गणेशोत्सवासाठी गावी येण्यास इच्छुक असणाऱ्या मुंबईकरांना गावकऱ्यांनी सांगितलं आहे की, गणेशोत्सवाच्या आधी काही दिवस गावी या आणि होम क्वांरटाईन व्हा. याबाबत अनेक ग्रामपंचायतींनी गणेशोत्सवासाठी मुंबईकर आणि बाहेरुन येणाऱ्या चाकरमान्यांसाठी पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी चाकरमान्यांसाठी काही सूचना दिल्यात. 

कोकण हे पारंपारिक गणेशोत्सवासाठी ओळखलं जातं. कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मालवण आणि रायगड येथील ग्रामपंचायतींनी सर्व सावधगिरीनं हा उत्सव कसा साजरा करायचा याचा निर्णय घेण्यासाठी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्‍यातील तिथवली दिगाशी गावकऱ्यांनी गणेशोत्सवासाठी मुंबईहून येणाऱ्या लोकांसाठी सूचनांसह पत्रं लिहिलं आहे. अशाच प्रकारचा पत्र व्यवहार अनेक ग्रामपंचायतींनीही केल्याचं समजतंय.

कोकणात गणपती हा सर्वात मोठा उत्सव आहे आणि या उत्सवासाठी मुंबईहून हजारो लोकं आपल्या कुटूंबियांसह आपल्या मूळ गावी जात असतात. मुंबई शहर हे कोरोना व्हायरसचं हॉटस्पॉट आहे. म्हणूनच या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींनी हा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे यावर्षी हा सण सर्व सावधगिरीने आणि सामाजिक अंतरावर साजरा केला जाईल.

गावात येणाऱ्या लोकांसाठी आम्ही काही नियम आखून दिलेत. त्या नियमांच त्यांना काटेकोरपणं पालन करावं लागेल अशा सूचनांसह एक पत्र देण्यात आलं आहे. गणपतीसाठी गावी येणाऱ्यांना 8 ऑगस्टपूर्वी गावात येऊन दोन आठवड्यांकरिता क्वांरटाईन राहणं आवश्यक असल्याचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोरे गावचे सरपंच महेंद्र रावराणे यांनी सांगितलं आहे. ग्रामपंचायतीनं जारी केलेल्या पत्रात लिहिलं आहे की, गणेशोत्सवात कोणीही सत्यनारायण पूजा करू नये. कारण लोकं मोठ्या संख्येनं एकत्र येऊ शकतात आणि सामाजिक अंतर असलेल्या नियमाचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. 

बर्‍याच गावकऱ्यांनी आरती आणि भजनासाठीही मोठ्या संख्येनं एकत्र न येण्याचं आवाहन केलं आहे. अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये आणि विसर्जनादरम्यान मिरवणूका काढू नका, अशा सूचनाही दिल्या आहेत. मास्क न घेता सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. 

रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील रहिवासी रामचंद्र माने म्हणाले, आमच्याकडे आधीपासूनच नियम आहे की मुंबईतून किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून येणाऱ्या लोकांना गावात 15 दिवस क्वांरटाईन होणं आवश्यक आहे. गणपतीच्या वेळीही आम्ही कुटुंबातील सदस्यांना सावधगिरीचा उपाय म्हणून सणाच्या 15 दिवस अगोदर आणि होम क्वांरटाईन होण्यास सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com