
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: पालिका निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाला चांगलेच वजन प्राप्त झाले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या घरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील दिपेश म्हात्रे यांच्याघरी गणपती दर्शनाला उपस्थिती लावल्याचे दिसून आले. भाजपाचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्याकडे खासदार गणपती दर्शनाला गेले तर कल्याण पूर्वेचे शिंदे सेनेचे महेश गायकवाड यांच्या घरी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण पोहोचले. पालिकेतील आपले वर्चस्व वाढविण्यासाठी भाजपा व शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच ठाकरेंच्या शिलेदारांच्या भेटी चर्चेचा विषय ठरत आहेत.