esakal | शनिवारी कोपरी पुलाचे गर्डर लॉन्चिंग,पुलावरील वाहतूक दोन रात्र राहणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

शनिवारी कोपरी पुलाचे गर्डर लॉन्चिंग,पुलावरील वाहतूक दोन रात्र राहणार बंद

नवीन कोपरी पुलाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या लोखंडी गर्डरचे लॉन्चिंग 16 आणि 17 तारखेच्या रात्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवारी कोपरी पुलाचे गर्डर लॉन्चिंग,पुलावरील वाहतूक दोन रात्र राहणार बंद

sakal_logo
By
राहुल क्षीरसागर

मुंबईः ठाणे आणि मुंबई शहरांना जोडणा-या नवीन कोपरी पुलाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या लोखंडी गर्डरचे लॉन्चिंग 16 आणि 17 तारखेच्या रात्री करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला आहे. जुन्या कोपरी पुलावर मोठी क्रेन उभी करून हे काम होणार असल्याने या पुलावरून मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने ये- जा करणा-या वाहनांना दोन रात्रींमध्ये किमान 14 तास प्रवेश बंद केला जाणार आहे. या कालावधीत वाहन चालकांनी पर्यायी मार्गांनी आपल्या इच्छित स्थळी प्रवास करावा, असे आवाहन करणारी अधिसूचना ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी जारी केली आहे.


जीर्ण झालेल्या जुन्या कोपरी पुलाला पर्याय ठरणा-या नव्या कोपरी पुलाचे बांधकाम ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून सुरू आहे. दोन टप्प्यात हे काम केले जाणार असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात जुन्या पुलाच्या शेजारी दोन्ही बाजूला मार्गिका उभारणीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. दोन्ही दिशेकडील मार्गिका जोडणीसाठी रेल्वे ट्रँकवर गर्डर उभारावे लागणार आहे. पालघर येथे सुरू असलेले या गर्डरचे काम पूर्ण झाले असून ते बसविण्याचे काम 16 जानेवारीपासून सुरू होत आहे. हे काम 16 जानेवारीला रात्री 11 ते 17 जानेवारीला पहाटे 6  वाजेपर्यंत तसेच, 17 जानेवारीला रात्री 11 ते 18 जानेवारीला पहाटे 6 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या कालावधीत मुंबईहून ठाणे आणि ठाण्याहून मुंबईच्या दिशेने ये- जा करणा-या सर्व हलक्या, जड आणि अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांना आपल्या इच्छितस्थळी जाता यावे, यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. 
 
जड – अवजड वाहनांसाठी

नाशिक मुंबई महार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणा-या जड-अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन गँमन चौक- पारसिक रेती बंदर- मुंब्रा बायपास- शिळफाटा उजवीकडे वळण घेऊन म्हापेमार्गे रबाळे- ऐरोली ब्रीज मार्गे पूर्व द्रुतगती मार्गने इच्छित स्थळी जातील. 

हेही वाचा- राणीच्या बागेतल्या पक्ष्यांवर आता २४ तास असेल करडी नजर

घोडबंदर महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणा-या जड- अवजड वाहनांना माजीवाडा ब्रिजवर उजवे वळण घेण्यास आणि गोल्डन क्राँस माजीवाडा ब्रिजखाली प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने तत्वज्ञान सिग्नलपुढे माजीवाडा ब्रिजवरून खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन गँमन चौक पारसिक रेती बंदर - मुंब्रा बायपास- शिळफाटा उजवीकडे वळण घेऊन म्हापेमार्गे रबाळे - ऐरोली ब्रिजमार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील. 
 
हलक्या वाहनांसाठी

  • नाशिक आणि घोडबंदर रोडने तसेच, ठाणे शहरांतून मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणा-या सर्व प्रकारच्या हलक्या वाहनांना नौपाडा सर्व्हिस रोड महालक्ष्मी मंदिरासमोरून कोपरी ब्रिजकडे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. 
  • नाशिकमार्गे मुंबईकडे जाणारी हलकी वाहने साकेत कट डावीकडे वळण घेऊन महालक्ष्मी मंदिर- साकेत रोड- क्रिकनाका डावीकडे वळण घेऊन शिवाजी चौक कळवा- विटावा -ऐरोलीहून ऐरोली ब्रिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने इच्छित स्थळी जातील. 
  • ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने ही जीपी ऑफिस- ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह रोड- आरटीओ कार्यालयासमोरून- क्रिकनाका- कळवा ब्रिज- शिवाजी चौक कळवा- विटावा- ऐरोलीहून - ऐरोली ब्रिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छितस्थळी जातील. 
  • घोडबंदर रोड आणि ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने तीन हात नाका येथून उजवीकडे वळण घेऊन एलबीएस रोडने माँडेला चेक नाका मार्गे इच्छितस्थळी जातील.   
  • घोडबंदर रोड आणि ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने ही तीन हात नाका, महालक्ष्मी मंदिर कट सर्व्हिस रोडने कोपरी ब्रिज, कोपरी सर्कल – बारा बंगला – फाँरेस्ट ऑफिस- माँ बाल निकेतन स्कूल- आनंदनगर चेकनाका मार्गे मुंबईकडे इच्छितस्थळी जातील.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Girder launch Kopari bridge Saturday  traffic bridge closed for two nights

loading image