
मुंबई, राज्यातील रहिवासी शिधापत्रिकेत नोंदवलेल्या पत्त्यावर रहात नसतील व ते कोठेही रहात असतील तरीही त्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून राहत्या ठिकाणीच अन्नधान्य द्यावे, अशी मागणी भाजपचे राज्य सरचिटणीस आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांना लिहिलेल्या पत्रात भातखळकर यांनी ही मागणी केली आहे. राज्यामध्ये टाळेबंदी शिथिल केल्यानंतर हजारो लोक आपल्या मूळ निवासस्थानावरून निघून गेले आहेत. शिधापत्रिकेत नोंदविलेल्या आपल्या मूळ पत्याचे ठिकाण कोरोना हॉटस्पॉट किंवा रेड झोन झाल्यामुळे अनेकांनी ते ठिकाण सोडून आपल्या गावी किंवा नातलगांकडे किंवा इतरत्र बस्तान हलवले आहे. हातावर पोट असलेले अनेकजण रोजीरोटी बंद झाल्याने कुटुंबासह गावी निघून गेले आहेत. मात्र त्यांच्या शिधापत्रिकेवर गावचा पत्ता नसल्याने त्यांना आता शिधा मिळत नाही. त्यामुळे त्यांचा व्यवसायही गेला, रोजगारही गेला व शिधापत्रिकेवरील धान्यही गेले, अशी त्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशा प्रकारची झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वस्व गमावलेल्या या लोकांना जगण्याचे एक साधन म्हणून शिधावाटप दुकानांमधून धान्य देण्यात यावे. त्यामुळे निदान त्यांना आहेत तेथे तरी सन्मानाने जगता येईल, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
जसे हजारो लोक मुंबईबाहेर गेले आहेत, तसेच मूळ पत्ता गावी असलेले हजारो लोक मुंबईतही आले आहेत. त्यांचीही अवस्था अशीच असून त्यांची शिधापत्रिका गावच्या पत्त्यावर असल्याने त्यांना आता मुंबईत धान्य मिळत नाही. शिधापत्रिका नसलेल्या पण आधारकार्ड असलेल्या नागरिकांना जसे केंद्र सरकार अन्नधान्य देत आहे, तसेच राज्यभरातील या नागरिकांनाही आधारकार्डवर धान्य द्यावे. तसे आदेश शिधावाटप विभागाला द्यावेत, परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ही व्यवस्था कायम ठेवावी, अशीही मागणी भातखळकर यांनी सरकारकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.