मंडप डेकोरेटर्स व्यवसायांना दिलासा द्या, शिवसेना आमदाराचं मुख्यमंत्र्यांना साकडं

मंडप डेकोरेटर्स व्यवसायांना दिलासा द्या, शिवसेना आमदाराचं मुख्यमंत्र्यांना साकडं

मुंबईः  लग्न-उत्सव-समारंभ आणि इतर सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणी 50 ऐवजी किमान 200 लोकांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मंडप डेकोरेटर्स आणि संलग्न सर्व व्यवसायांना परवानगी द्यावी आणि त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की , 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर गेल्या 7 महिन्यांपासून मंडप डेकोरेटर्स आणि त्याच्याशी संलग्न व्यावसायिकांवरही मोठे आर्थिक संकट आले आहे. मंडप डेकोरेटर्स आणि त्याच्याशी संबंधितांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे या व्यावसायिकांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्र राज्यातील इतर अनेक शहरांबरोबरच ठाणे आणि मीरा भाईंदरमधील मंडप डेकोरेटर्स व्यावसायिकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. 

200 किंवा त्यापेक्षा जास्त आसन क्षमता असलेले छोटे-मोठे चित्रपट गृह, नाट्यगृह सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टोरंट सुरु आहेत. त्यामुळे आता मंडप डेकोरेटर्स आणि संलग्न व्यवसाय पूर्णपणे 'लॉकडाऊनमुक्त' करा, त्यांचेही सर्व व्यवसाय सुरळीत करावेत एवढी अपेक्षा त्या व्यवसायिकांकडून व्यक्त होत आहे.

लॉकडॉऊनचा फटका बसलेल्या मंडप, लाईट आणि डेकोरेटर्स व्यवसायिकांनी विविध मागण्यांसाठी ठाण्यामध्ये आंदोलन सुरु केले आहे. व्यवसायिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी. यासह लग्नसमारंभाची असणारी मर्यादा वाढवण्यात यावी अशा त्यांच्या अनेक मागण्या आहेत. लॉकडाऊन काळात मंडप, लाईट आणि डेकोरेटर व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मंडप, लाईट आणि इतर संबंधित व्यवसायिकांवर तसेच त्यांच्याकडे काम करणाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शेकडो मंडप, डेकोरेटर्सचा व्यवसाय ठप्प झाला आहे. यामुळे मंडप व्यावसायिकांचे साहित्य हे अक्षरशः धूळ खात पडले आहे. यातच सरकारने लग्न कार्य, समारंभ किंवा इतर कार्यक्रमांसाठी फक्त 50 लोकांना परवानगी दिली असल्याने मंडप व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता 50 लोकांची मर्यादा उठवून किमान 200 पेक्षा जास्त करावी अशी विनंती सरनाईक यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुरक्षेचे उपाय करून 50 ते 200 जणांच्या उपस्थितीला परवानगीची मुभा आहे, असे म्हटले आहे. पण राज्य सरकारने 50 जणांनाच परवानगी दिली आहे. शुभ कार्य, समारंभ किंवा कार्यक्रम याठिकाणी लोकांच्या उपस्थितीची मर्यादा किमान 200 ते 300 करावी अशी या व्यावसायिकांची मागणी आहे. 

दिवाळीनंतर लग्नसराई जवळ आली आहे. त्यामुळे आताच सरकारने याबाबत निर्णय घेतल्यास मंडप आणि त्याच्याशी संबंधित व्यावसायिक यांना मोठा दिलासा मिळू शकेल. मंडपात हवा खेळती राहते तसेच सोशल डिस्टंन्सचे पालनही सगळे करू शकतात. राज्य सरकारकडून 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत जवळपास सर्वच व्यवसाय, उद्योग आणि जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे काम झाले आहे.

मंडप डेकोरेटर्स, साउंड व्यावसायिक, जनरेटर व्यावसायिक, कॅटरर्स, सिंगर, बेंजो व्यावसायिक यातून मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळत असल्याने त्या सगळ्यांनाही सरकारकडून दिलासा देण्याची गरज आहे असे सरनाईक यांनी म्हटले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर लग्न, उत्सव, समारंभ म्हणजेच शुभ कार्याच्या आणि इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी 50 ऐवजी किमान 200 लोकांना परवानगी देऊन मंडप डेकोरेटर आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्व व्यवसायांना उभारी देण्यात यावी. याबाबत आपण तात्काळ आदेश द्यावेत,  अशी विनंती प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Give relief decorators business Shiv Sena MLA pratap sarnaik request Chief Minister

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com