गोव्यातील विदेशी दारूचा साठा महाराष्ट्रात केला जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोव्यातील विदेशी दारूचा साठा महाराष्ट्रात केला जप्त

गोव्यातील विदेशी दारूचा साठा महाराष्ट्रात केला जप्त

मुंबई: गोव्यात उत्पादन केलेल्या मद्याची महाराष्ट्रात वाहतूक करून बेकायदेशीर मार्गाने मद्याची विक्री करण्याचा डाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने उधळून लावला. पळस्पे गावाच्या हद्दीतून गोव्याकडून मुंबईकडे जाणाच्या राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून टाटा कंपनीच्या मालवाहक ट्रकवर कारवाई करण्यात आली. या वाहनातून गोवा राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याची वाहतूक करून हे मद्य बेकायदेशीर मार्गाने विकलं जाणार होतं. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने हा साठा जप्त केला. (Goa Made Liquor Seized in Maharashtra illegal transportation)

हेही वाचा: "शिवसेनेला कोकणी माणसाने खूप काही दिलं, पण..."

कारवाई केलेल्या साठ्यात रॉयल चॅलेंज, ऑफिसर्स चॉईस ब्ल्यू व्हिस्की व ओल्ड मंक रमचे 180 मिली व 750 मिली क्षमतेचे एकूण 500 बॉक्स व वाहनासह एकूण 56 लाख 50 हजार 500 रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी वाहन चालक शिंकू विरेंद्रकुमार मिश्रा व शैलेश अच्युतन पद्मावती ट्रक क्लिनर यासह फरारी आरोपींवर विक्रीकरता असलेला मद्याचा साठा बेकायदेशीररित्या वाहतूक करून महाराष्ट्र शासनाच्या महसूलाचे मोठया प्रमाणात नुकसान केल्याने त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा: P305 बार्ज दुर्घटना: अखेर कॅप्टनविरोधात गुन्हा दाखल

या गुन्ह्याच्या पुढील तपासात गोवा निर्मित व विक्रीकरीता असलेला मद्यसाठा दुबे नामक मध्यस्थीमार्फत अशोकने भरुन दिल्याचे आरोपींनी सांगितले. तर हा मद्यसाठा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोईप येथील रहिवासी काशिराम आंगणे यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. आंगणे यांच्या सांगण्यावरुन आरोपी मद्यसाठ्याने भरलेला ट्रक पनवेल येथे घेऊन जात होता. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने कारवाई केली आहे. यामध्ये मद्यसाठा पुरवठादार, मद्य खरेदीदार यासह आणखी आरोपी वाढण्याची शक्यता मुंबई भरारी पथकाचे प्रमुख निरीक्षक संताजी लाड यांनी सांगितले आहे.

तक्रार करण्याचे आवाहन

अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 19008333333 आणि व्हॉटस अॅप क्रमांक 8422001133 तसेच दूरध्वनी क्रमांक 022- 22663882 या क्रमांकावर संपर्क करून तक्रार करण्याचे आवाहन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केले आहे.

(संपादन- विराज भागवत)

loading image
go to top