पोलादपूर : मोरे महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी.
पोलादपूर : मोरे महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी.

मोरे महाविद्यालयाला नॅकचा ‘बी’ दर्जा

पोलादपूर (बातमीदार) : सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला नॅक (राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद) या देशातील सर्वोच्च संस्थेकडून महाविद्यालयाच्या तिसऱ्या मानांकन प्रक्रियेत बी दर्जासह अधिस्वीकृती व मानांकन प्राप्त झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक रावेरकर यांनी दिली आहे. नॅकच्या सुधारित ऑनलाईन प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून उच्च मानांकन प्राप्त करणारे रायगड जिल्ह्यातीत सुंदरराव मोरे हे पहिले महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाला संयुक्त २.२८ सरासरी श्रेयांकासह (सीजीपीए) बी दर्जा प्राप्त झाल्याची घोषणा १४ फेब्रुवारीला नॅक संस्थेने केली. 

नॅकच्या सुधारित ऑनलाईन प्रक्रियेअंतर्गत महाविद्यालयाने नॅककडून महाविद्यालयाच्या संस्थात्मक माहितीचे गुणवत्ता निर्धारण करण्यात आले. त्यानुसार महाविद्यालयाला नॅकच्या तिसऱ्या मूल्यमापन आणि अधिस्वीकृती प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी परवानगी देण्यात आली.  यानंतर महाविद्यालयाने आपला स्वयंअध्ययन अहवाल ऑनलाईन पद्धतीने नॅककडे सादर केला. या अहवाल सादरीकरणाबरोबरच नॅक संस्थेकडून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी समाधान सर्वेक्षण (ट्रीपल एस) करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर सादर केलेल्या स्वयंअध्ययन अहवालातील माहितीबाबत महाविद्यालयाने सत्यापन आणि प्रमाणीकर (डीव्हीव्ही) प्रक्रिया आणि अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर नॅक संस्थेकडून २२ व २३ जानेवारी या तारखांना महाविद्यालयाचे मूल्यांकन करण्यासाठी नॅक पिअर टीमची भेट ठरवली.

या भेटीमध्ये आंध्र प्रदेशस्थित रायलसीमा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रसादा राव आलमंडा (अध्यक्ष) मिझोराम विद्यापीठातील वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. एन. आर. सिंग (समन्वयक), तसेच गुजरातमधील खेडा - खतलाल येथील प्राचार्य डॉ. सुरेश गढवी (सदस्य) या नॅक पिअर टीमच्या सदस्यांनी महाविद्यालयातील विविध विभाग, समित्या, भौतिक सुविधा  आदींची पाहणी केली. त्यानंतर शिवाई संस्थेचे संचालक मंडळ, विद्यमान विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक आदींसोबत चर्चा करून नॅकला अहवाल सादर केला. या अहवालानुसार १४ फेब्रुवारीला महाविद्यालयाच्या तिसऱ्या मूल्यांकनातील सीजीपीए, ग्रेड इत्यादी बाबींची अधिकृत घोषणा नॅक संस्थेकडून करण्यात आली.

नॅक पुर्नमूल्यांकनाच्या प्रक्रियेसाठी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे (आयक्‍यूएसी) समन्वयक प्रा. महेश वल्ले आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील बलखंडे, आयक्‍यूएसी कमिटीचे सर्व सदस्य, कार्यालय अधीक्षक मुकुंद पंदेरकर, महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींनी या नॅक मूल्यांकन प्रक्रियेचे यशस्वी संयोजन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे यश
महाराष्ट्राचे माजी ग्रामविकास मंत्री आणि महाविद्यालयाचे संस्थापक दिवंगत प्रभाकरजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली १९९८ मध्ये सुरू झालेले सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गेल्या २० वर्षांहून अधिक काळ पोलादपूर या डोंगरी, दुर्गम व ग्रामीण भागात कार्यरत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने राबवण्यात येणारे विविध उपक्रमावर महाविद्यालयाने स्थापनेपासूनच भर दिला आहे. महाविद्यालयात राबवण्यात आलेले विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम, बौद्धिक संपदाविषयक राज्यस्तरीय कार्यशाळा, अन्य शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी करण्यात आलेले सामंजस्य करार, ग्रंथालयाचे संगणकीकरण, तसेच महाविद्यालयात राबवण्यात आलेले जेंडर ऑडिट, बायोडायव्हर्सिटी रजिस्टर, रेन हार्वेस्टमेंट प्रकल्प, महाविद्यालयाचे अकॅडमिक ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट आदी नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळेच महाविद्यालयाला तिसऱ्या मानांकनात बी ग्रेड प्राप्त करणे शक्‍य झाल्याचे मत प्राचार्य डॉ. दीपक रावरकर यांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com