विरोधकांच्या भीतीमुळे सरकारचा अधिवेशनापासून पळण्याचा प्रयत्न: भाजप

कृष्ण जोशी
Thursday, 3 December 2020

फक्त दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन जाहीर करून सरकारने पळण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

मुंबई: राज्यातील जनतेचे महत्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन आठवड्याचे हिवाळी अधिवेशन गरजेचे होते. मात्र सरकारला आक्रमक विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जायचे नाही. त्यामुळे फक्त दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन जाहीर करून सरकारने पळण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

काही महत्वांच्या विषयांवर विरोधक सरकारचा पर्दाफाश करतील ही सरकारला भीती आहे. म्हणूनच अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचेही ते म्हणाले. 

हे अधिवेशन दोन दिवसाचेच घेण्याचे सरकारचे पूर्वनियोजित धोरण होते. आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सरकारने केवळ सोपस्कर पूर्ण केले. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा विषय, कोरोनाचे संकट, महिलांचे विनयभंग, बलात्कार, अत्याचार असे गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नांना न्याय देण्यासाठी दोन आठवड्यांच्या अधिवेशनाची आपण मागणी केली होती, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा-  प्रत्येक आठवड्याला 30 लाखांची ड्रग्स विक्री, मोठा कालाचिठ्ठा झाला उघड

आता सरकारने अनलॉकिंगमध्ये सर्वच सार्वजनिक स्थळे उघडी केली आहेत. मुंबईतील उपनगरी रेल्वे सेवाही सर्वांना खुली करण्याच्या हालचाली सुरु आहेत. जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी विधिमंडळाचे सभागृह आहे ही गोष्टही आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली, असे सांगून दरेकर पुढे म्हणाले की, राज्यात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी दिशा सारखा कायदा आणण्याचे सूतोवाच या सरकारने केले होते. पण वर्ष झाले तरीही सरकराने यावर काहीच केले नाही. त्यामुळे या अधिवेशनात दिशा कायदा आणावा, तसेच मराठा आरक्षण संदर्भात सरकारचे नेमके काय धोरण आहे हे जनतेला कळण्यासाठी त्याचे उत्तर सरकारने अधिवेशनात द्यावे अशी मागणीही विरोधी पक्षामार्फत करण्यात आल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

फडणवीसांचे सरकारवर आरोप 

हिवाळी अधिवेशन दोन दिवसांचं होणार आहे. आमचा आग्रह होता की महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, शेतकरी अडचणीत आहेत, कापूस, सोयाबीनचं मोठ नुकसान झालंय. मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. ओबीसींमध्ये भीतीचं वातावरण आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला खडे बोल सुनावले जाताहेत. विधानभवन हे महत्त्वाचं स्थान असताना दोन दिवसांचा अधिवेशन म्हणजे पळ काढणे एवढाच विषय असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

अधिक वाचा-  कॉमेडियन भारती सिंह ड्रग्स प्रकरणः NCB चे दोन अधिकारी निलंबित

दुसरीकडे मराठा आरक्षणचा मुद्दा, ओबीसी समाजाची मागणी, राज्यात महिलांवर वाढते अत्याचार, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला मिळालेली चपराक, अशा सर्व विषयांवर चर्चा व्हावी अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी किमान दोन आठवड्याचं अधिवेशन घ्या, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली होती. पण सरकारकडून ती मान्य करण्यात आली नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Government tries run away from convention due fear of opposition BJP pravin darekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government tries run away from convention due fear of opposition BJP pravin darekar