
मुंबई : राज्याचे आर्थिक चक्र थंडावू नये म्हणून राज्य सरकारने एप्रिल महिन्याअखेरीस कारखाने सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली. मे महिन्यात आशादायक परिस्थिती निर्माण होऊनही त्यानंतर दोन महिन्यांत परिस्थितीत वेगवान फरक पडला नसल्याचे चित्र सध्या आहे. तर सूक्ष्म व लघु उद्योग मोठ्या संख्येने सुरु झाले असावेत, असे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.
सरकारने कारखाने सुरु करण्यास 20 एप्रिल रोजी परवानगी दिल्यावर 15 मेपर्यंत राज्यात लहानमोठे सुमारे 40 हजार उद्योग सुरु झाले होते. त्यात अंदाजे 11 लाख कामगार काम करू लागल्याची माहिती देसाई तसेच विभागाचे प्रधानसचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी 'सकाळ'ला त्यावेळी दिली होती. त्यानंतर आजपर्यंत राज्यात एकूण 70 हजार लहानमोठे उद्योग सुरु झाले असून त्यात साडेसोळा लाख कामगार कामावर आल्याचे देसाई यांनी आज 'सकाळ'ला सांगितले. अर्थात अजूनही उद्योग सुरु होण्यात अनंत अडचणी आहेत. तसेच सूक्ष्म व लघु उद्योग मोठ्या संख्येने सुरु झाले असतील; मात्र त्यांचा नेमका तपशील आता विभागाकडे नाही, असेही ते म्हणाले.
या सत्तर हजार कारखानदारांनी उद्योग विभागाच्या यंत्रणेत संमती मागितली होती. मात्र आमच्या संमतीच्या अटीची गरज नसणारे लघू व सूक्ष्म उद्योग मोठ्या संख्येने सुरु झाले असतील. कामगारांची कमतरता, कच्च्या मालाचा अभाव, अद्यापही बऱ्याच ठिकाणी सुरु असलेला लॉकडाऊन व त्यामुळे वाहतुकीत येणारे अडथळे या मुख्य अडचणींमुळे कारखाने काम सुरु करण्याच्या अवस्थेत नाहीत. मुंबई-ठाण्यात अद्यापही लॉकडाऊन आहे, जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत; मात्र याही अडचणींवर मार्ग काढून काम सुरु आहे. राज्यात परिस्थिती सुरळित नाही, कारण रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढतो आहे व त्याचा फटका उद्योगांना बसतो आहे, असेही देसाई यांनी दाखवून दिले.
देशातही रोगाचा फैलाव वाढतो आहे व अशा स्थितीत उद्योगांची परिस्थिती केव्हा सुरळित होईल हे सांगणे कठीण आहे. कोरोनाचा फैलाव थांबला तर सर्वकाही आलबेल होईल. कोरोना व त्यामुळे लोकांच्या मनातील भीती यामुळे चक्र मंदावले आहे; मात्र उद्या लोकांनी अशाच अवस्थेत जरूर ती काळजी घेत कामे सुरु केली तर चित्र पालटेलही. मात्र असा काही सामूहिक निर्णय होईल का, हे आपण सांगू शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.