ठोस निर्णय नसल्याने...पालकमंत्री अदिती तटकरेंची 'या' प्रकल्पाला भेट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 March 2020

रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी (ता.1) खांदेश्‍वर व मानसरोवर येथील सिडकोच्या पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरे बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पाला भेट दिली.

पनवेल : रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी रविवारी (ता.1) खांदेश्‍वर व मानसरोवर येथील सिडकोच्या पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरे बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पाला भेट दिली. या प्रकल्पाला येथील नागरिकांचा विरोध आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी पालकमंत्री व नगर विकास राज्य मंत्र्यांसोबत रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली. 

ही बातमी वाचली का? ज्या गावात भीख मागितली त्याच गावात माझा सत्कार झाला

नवी मुंबई आणि पनवेल परिसरात सिडकोने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. विशेष म्हणजे बस व वाहनतळाच्या जागेवर हे गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात आहेत. याला नागरिक तसेच सामाजिक संस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ही घरे दुसऱ्या ठिकाणी बांधावीत. ही जागा ज्या कारणासाठी राखीव आहे, त्याच कारणाकरिता वापरण्यात यावी, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, पालकमंत्री, तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घालण्यात आले होते; परंतु याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्या पार्श्‍वभूमीवर कामोठ्यातील खांदेश्‍वर व मानसरोवर स्थानकालगत येऊ घातलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या जागेच्या पहाणी दौऱ्याकरिता नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, रायगडचे खासदार सुनील तटकरे, कोकण विभाग शिक्षक आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, जे. एम. म्हात्रे, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक सतीश पाटील, रामदास शेवाळे, बबन पाटील, रंजना सडोलीकर तसेच शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे नगरसेवक व प्रमुख स्थानिक नेते, पालिका अधिकारी, तहसील कार्यालयातील अधिकारी व सिडकोचे अधिकारी उपस्थित होते. 

ही बातमी वाचली का? धनिकांच्या सोईसाठी मुंबई-पुणे महामार्ग बंद

लोकांशी संवाद 
पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांनी खांदेश्‍वर व मानसरोवर स्थानकालगतच्या परिसरात फिरून त्यांनी लोकांशी संवाद साधला. यावेळी सुनील तटकरे यांनी नागरी हक्क समिती, कफ व इतर सामाजिक संस्थांच्या तसेच कामोठ्यातील इतर सामान्य नागरिकांना, आपण त्यांच्यासोबत असल्याचे सांगून हा प्रश्‍न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच शरद पवार साहेब यांच्याकडून तडीस लावण्याचे आश्‍वासन दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: guardian minister aditi tatkare visit to a housing project in Mansarovar, Khandesh