कोरोनातून बरे झालेल्या 80 टक्के रुग्णांमध्ये केसगळतीची समस्या

भाग्यश्री भुवड
Wednesday, 13 January 2021

कोरोनातून बरे झालेल्या 80 टक्के लोकांमध्ये इतर समस्येसह आता केसगळतीच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.

मुंबई: कोरोनातून बरे झालेल्या 80 टक्के लोकांमध्ये इतर समस्येसह आता केसगळतीच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. शिवाय, ज्यांना कोरोना झालेला नाही अशांमध्ये वाढलेल्या तणावातून केसगळती होत असल्याची तक्रारी पालिकेच्या रुग्णालयांमध्ये घेऊन रुग्ण दाखल होत आहेत. कोरोना आपल्याला झाला त्यामुळे आपल्या कुटुंबाला होईल का? किंवा आपण त्यातून बाहेर येऊ का आणि कोरोना आपल्याला होईल का ? अशा अनेक प्रश्नांमुळे लोक घाबरले आहेत. यातून त्यांच्या मानसिक तणावात भर पडली आहे. शिवाय, केस गळती हा विषय अत्यंत गंभीर पण दुर्लक्षित असा विषय असल्यामुळे आता कोरोना काळात या समस्येवरुनही लोकांची चिंता वाढली आहे.

पालिकेच्या केईएम रुग्णालयात पोस्ट कोविड उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये केसगळतीच्या समस्या घेऊन येणाऱ्यांची ही गर्दी वाढली असल्याचे केईएम रुग्णालयाच्या त्वचा विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सिद्धी चिखळकर यांनी सांगितले.

हेही वाचाअखेर लोअर परळ पुलाच्या पश्चिम दिशेकडील भागाचे काम पूर्ण

केसगळतीची महामारी

केईएम रुग्णालयाच्या त्वचा विभागाच्या ओपीडीत दररोज किमान त्वचेसह केसगळतीची तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेत भर पडली आहे. दरम्यान, कोविड महामारीसारखी केसगळतीची ही महामारी आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण, एवढ्या गंभीर प्रमाणात केसगळती होण्याचे निरीक्षण असल्याचे डॉ. चिखळकर यांनी सांगितले.

कोविड झाल्यानंतर तीन महिन्यांनी उद्भवते समस्या

पोस्ट कोविडमध्ये त्वचेच्या समस्येसह येणारे रुग्ण ही केस गळतीच्या तक्रारी करत आहेत. कोविड झाल्याच्या तीन महिन्यानंतर वाढलेल्या तणावातून केसगळतीची समस्या उद्भवत आहे. केईएम रुग्णालयात त्वचा विकार घेऊन येणाऱ्या 250 रुग्णांपैकी 30 टक्के रुग्ण केसगळतीची तक्रार करतात. बरेच जण कधी कधी अर्धे केस राहिल्याच्या तक्रारी करतात. व्हिटॅमिन डी, लोहाचे प्रमाण कमी असेल याचा ही परिणाण होतो. कोविड नियंत्रणात येत आहे मात्र, तणावातून बाहेर काढण्यासाठी लोकांना ध्यानधारणा आणि समुपदेशनाची गरज आहे.मात्र, या परिस्थितीवर ही उपचार आणि औषधं उपलब्ध आहेत.
डॉ. सिद्धी चिखळकर, सहयोगी प्राध्यापक , त्वचा विभाग, केईएम रुग्णालय

अतिविचारातून केसगळती वाढते

आधी टायफॉईड झाल्यानंतर केसगळतीच्या समस्या उद्भवयाच्या. पण, आता कोविड महामारीत ही समस्या जाणवतेय. कारण, लोक आपल्याला कोरोना होणार नाही ना? झालाच तर कुटुंबाला ही होईल का ? अशा प्रश्नांच्या विळख्यात आहेत. ज्याचा परिणाम अदृश्यरित्या केसांवर होतो आहे. महिलांना घर आणि ऑफिस अशी दुहेरी कसरत करावी लागली. शिवाय, ज्यांच्या आधीपासून केसांची ट्रिटमेंट सुरू होती. खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स उपलब्ध होत नव्हते. शिवाय, ऑनलाईन सल्ल्यानेही जास्त फायदा होत नव्हता. याचा ही परिणाम झाला आहे. डायट केल्यामुळे योग्य आहार ज्यांनी घेतला नाही, त्यात जीवनसत्वाचा अभाव, मानसिक तणाव या सर्वांचा परिणाम केसांवर झाला आहे.

यावर उपचार काय ?

केसांसाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. ऋुतूनुसार फळे, पालेभाज्यांचे सेवन जेवणात करणे आवश्यक आहे.
चुकीचे डायट करु नये.
शरीरातील व्हिटामिन वाढेल यासाठी आहारात बदल करणे.
व्यायाम करणे, व्हिटामिन डी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. बाजारात विविध प्रकारची सिरम उपलब्ध आहेत त्यांचा ही वापर केला जाऊ शकतो. 

फक्त पोस्ट कोविडच केसगळतीची समस्या होत नसून ज्यांना झालेला नाही त्यांनी ही केसगळतीची तक्रार डॉक्टरांकडे केलेली आहे. त्यामुळे, यावर घाबरुन न जाता उपचार आणि निदान होणे गरजेचे आहे, असे ही डॉ. चिखळकर यांनी सांगितले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

केसगळतीवर मिळवता येते नियंत्रण

कोणताही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ताप येतो आणि त्यातून किमान दिड ते तीन महिन्यादरम्यान केसगळतीची समस्या होते. मात्र, केसगळतीवर उपचार, चांगला आहार आणि योग्य निदान करुन नियंत्रण मिळवता येते. बाहेरचे पदार्थ खाणे जास्तीत जास्त टाळले तर तरुणांमध्ये होणारी केसगळतीही नियंत्रणात येऊ शकते.
डॉ. चित्रा नायक, विभागप्रमुख, त्वचारोग, नायर रुग्णालय

मानसिक तणावातून केसगळतीच्या समस्या

कोविडमुळे मानसिक तणावात आधीच भर पडली आहे. त्यातून केसगळती होत आहे. ज्यांना कोविड झाला आहे ते ही आणि ज्यांना नाही झाला त्यांनाही या समस्या जाणवत आहेत. पण, आता अशा रुग्णांमध्ये भर पडली आहे. यावर समुपदेशन करुन मार्ग काढता येतो. जवळपास 50 ते 60 टक्के लोकांमध्ये याचा परिणाम जाणवत आहे.
डॉ. स्मिता घाटे, त्वचारोगतज्ज्ञ, सायन रुग्णालय

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Hair loss problems 80 percent patients recover Corona virus


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hair loss problems 80 percent patients recover Corona virus