निम्म्या हृदयविकार रुग्णांनी तातडीचे उपचार टाळले; अभ्यासातून माहिती समोर!

भाग्यश्री भुवड
Friday, 4 September 2020

कोरोना काळात 50 टक्के हृदयविकार रुग्णांनी तातडीने उपचार घेण्याचे टाळले असल्याचे सर्व्हेक्षण युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने मांडले आहे.

मुंबई : कोरोना काळात 50 टक्के हृदयविकार रुग्णांनी तातडीने उपचार घेण्याचे टाळले असल्याचे सर्व्हेक्षण युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने मांडले आहे. हृदयविकार असलेल्या रुग्णांना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे उपचार आणि काळजी घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागला आहे. डॉक्‍टरांना भेटायला येणाऱ्या रुग्णांच्या मनात या बदलांबद्दल भीती आहे. त्यामुळे उपचारास येणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. मत अपोलो रुग्णालयाचे हद्यरोगशास्त्राचे सल्लागार डॉ. राहुल गुप्ता यांनी व्यक्त केले आहे. 

ही बातमी वाचली का? 'तर, शिवसेना महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घालेल'; संजय राऊतांची कडक शब्दात टीका

युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने केलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे, की कोरोनाच्या साथीच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये रुग्णालयात येऊन तातडीचे उपचार घेणाऱ्या हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या 50 टक्‍क्‍यांनी कमी झाली. कोरोनाच्या संकटामुळे आरोग्यसेवा क्षेत्राच्या दैनंदिन कामकाज पद्धतीत मोठा बदल झाला आहे. कोरोना नंतरच्या काळात वाढत्या आव्हानांशी तसेच भविष्याशी जुळवून घेण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. विशेषत: हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार पूर्वीपासून असलेल्या रुग्णांबाबत आरोग्यसेवेतील मार्गदर्शक तत्त्वे आणि उपचार यांमध्ये असंख्य बदल झाले आहेत. या बदलांबाबत रुग्णांच्या मनात भीती आहे. त्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांचे जीवन धोक्‍यात आले आहे. म्हणूनच रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घेणे हे सुरक्षित आहे. याबाबत या रूग्णांमध्ये विश्वास वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक आहे. असेही डॉ. राहुल गुप्ता म्हणाले आहे. 

ही बातमी वाचली का? तुमच्या सॅनिटायझरमध्ये भेसळ तर नाही ना? होतोय हानिकाराक वस्तूंचा वापर!

उपचारांसाठी 'टेलि-हेल्थ'चा वापर 
'टेलि-हेल्थ' ही संकल्पना देखील काळानुरुप वापरली जाईल. सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांची काळजी घेण्यासाठी 'टेलि-हेल्थ' ही पद्धती वापरली जाऊ शकते. हृदयविकारावरील काही विशिष्ट उपचार आताच्या परिस्थितीत थांबवून चालणार नाहीत. 

ही बातमी वाचली का? 'कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही'; गृहमंत्री अनिल देशमुखांची तीव्र प्रतिक्रीया

कोरोना काळात 50 टक्के हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी उपचार घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे, 'टेलि-हेल्थ सेवा देशातील हृदयविकाराच्या उपचारासंबंधी उपयुक्त ठरू शकते. आरोग्यसेवेची मार्गदर्शक तत्त्वे आणि तंत्रज्ञान यांचे प्रमाण वाढवण्यासाठी या प्रकरणांची नोंद करण्याचा हा एक प्रभावी मार्ग असू शकतो. 
- डॉ. राहुल गुप्ता, हद्यरोग सल्लागार, अपोलो रुग्णालय 

----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half of the heart patients avoided emergency treatment; In front of the information from the study!