...यामुळे जडतायेत साथीचे आजार! आर्थिक पाहणी अहवालात नमूद...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

राज्यात रोज निर्माण होणाऱ्या ५३ टक्के सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जात आहे. रोज ३७२ कोटी लिटर सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जात आहे. राज्यातील ४९ नद्या प्रदूषित आहेत. तपासणी झालेले निम्मे भूजल साठेही दूषित आहेत.

मुंबई : राज्यात रोज निर्माण होणाऱ्या ५३ टक्के सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जात आहे. रोज ३७२ कोटी लिटर सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जात आहे. राज्यातील ४९ नद्या प्रदूषित आहेत. तपासणी झालेले निम्मे भूजल साठेही दूषित आहेत. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार दूषित पाण्यामुळे राज्यात साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

ही बातमी वाचली का? भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार

महाराष्ट्रातील नागरी भागात दररोज ७८९ कोटी लिटर सांडपाणी निर्माण होते. त्यातील ४१९ कोटी लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित म्हणजे ३७२ कोटी सांडपाणी थेट नदी वा नाल्यांमध्ये सोडले जाते. राज्यातील २७ महापालिकांबरोबरच ३९३ शहरी आणि निमशहरी भागांत अशी परिस्थिती आहे, अशी माहिती राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. देशातील १३ टक्के सांडपाणी महाराष्ट्रात निर्माण होते. जलस्रोत दूषित होण्याचे प्रमुख कारण हे नागरी वस्त्यांमधील सांडपाणी मानले जाते. त्याखालोखाल कारखान्यांमधील सांडपाण्याचा क्रमांक लागतो. दूषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचेही आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. नगरपालिका क्षेत्रांमधील ८८ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नाही.

ही बातमी वाचली का? पन्नास वर्षे बाबांनी महाराष्ट्र जपला- सुप्रिया सुळे

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या एका अहवालानुसार ६६ भूमिगत जलस्रोतांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३३ जलस्रोत प्रदूषित असून त्यातील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे तपासणीत आढळले आहे. अवघ्या १० ठिकाणचे पाणी नागरिक पिण्यासाठी वापरू शकतात असे आहेत. भूजलपातळी दूषित होत असतानाच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील ४९ नद्या प्रदूषित आहेत. प्रदूषित नद्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. विशेषत: राज्यातील शहरी भागातील सर्वच नद्या प्रदूषित आहेत.

ही बातमी वाचली का? परदेशवारी केलेल्यांवर 14 दिवस देखरेख

मुंबईत भूजल पाणी पिण्यासाठी नाही
मुंबईतील भूजलाची वेळोवेळी तपासणी करण्यात आली. हे पाणी पिण्यासाठी वापरू नये, असे आदेशच महापालिकेकडून देण्यात आले आहेत. मुंबईत भूमिगत मलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या आहेत. तसेच गटार-नाल्यांमध्येही सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे भूजलसाठे दूषित झाले आहेत.

ही बातमी वाचली का? ठाण्यात-पोलिस रिक्षाचालक वाद

दृष्टीक्षेप

  • २७ महापालिकांमधून ६७१ कोटी लिटर सांडपाणी निर्माण होते.
  • २६४कोटी लिटर पाणी प्रक्रिया न करता जलस्रोतात साडले जाते.
  • २३१ नगरपालिकांमधून १०१ कोटी लिटर सांडपाणी निर्माण होते.
  • ८९ कोटी लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता जलस्रोतात सोडले जाते.
  • दूषित पाण्यामुळे होणारे आजार - कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, संसर्गजन्य कावीळ आणि विषमज्वर.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half of the sewage is not processed in maharashtra