esakal | नवी मुंबईतही जोरदार पाऊस; डी.वाय.पाटील स्टेडीयमवरील छप्पर कोसळले...
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईतही जोरदार पाऊस; डी.वाय.पाटील स्टेडीयमवरील छप्पर कोसळले...

मंगळवार दुपारपासून नवी मुंबईसह मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नवी मुंबईत ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

नवी मुंबईतही जोरदार पाऊस; डी.वाय.पाटील स्टेडीयमवरील छप्पर कोसळले...

sakal_logo
By
सुजीत गायकवाड

नवी मुंबई : गेले अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने आज वादळी वाऱ्यासोबत नवी मुंबई-पनवेल परिसरात कोट्यवधी रूपयांचे नुकसान केले. उरणमधील जेएनपीटी बंदरावरील तीन महाकाय क्रेन मोडून पडल्या. ताशी 80 किलो मीटर वेगाने सुरु असलेल्या वाऱ्यामुळे नेरूळमधील डी. वाय. पाटील स्टेडीयमवरील भव्य पत्रा त्याच्या सांगाड्यासोबत एखाद्या कागदासारखा अलगद उडून गेला. पत्र्याचे अवशेष शीव-पनवेल महामार्गावर न जाता स्टेडीयमच्या आवारातच पडल्यामुळे मोठी हानी टळली. वाऱ्याचा जोर संध्याकाळपर्यंत राहील्याने शहरातील सुमारे 80 हून अधिक झाडे उन्मळून पडली.

मुंबईची लाईफलाईन पुन्हा ठप्प; तीनही रेल्वेमार्गावर पाणी भरले...

नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात मंगळवारपासून पावसाला सुरूवात झाली. बुधवारी सकाळी नवी मुंबई भागात पावसाची रिपरीप सुरूच होती. मात्र दुपारनंतर पावसासोबत वादळी वारेही आले. या वाऱ्याचा वेग ताशी 80 किलो मीटर इतक्या वेगाचा असल्यामुळे समुद्रकिनारी उभ्या असणाऱ्या जेएनपीटीच्या महाकाय क्रेन त्याच्या तावडीत सापडल्या. अंदाजे 4 वाजल्याच्या सुमारास बंदरावरील महाकाय तीन क्रेन गवताच्या पातीप्रमाणे मध्येच मोडन पडल्या. कुलाबा हवामान खात्याने आधीच सतर्कतेचा इशारा दिल्यामुळे जेएनपीटी प्रशासनाने कंन्टेनर हाताळणीचे काम थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. मात्र पुढील काही दिवस क्रेन दुरूस्त होईपर्यंत कंन्टेनर हाताळणीचे काम थांबणार असल्याने कोट्यवधी रूपयांचे नुकसान जेएनपीटी प्रशासनाला सोसावे लागणार आहे. 

नवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरु

वाऱ्याचा वेग इतका जास्त होता की शीव-पनवेल महामार्गलगत असणारा डी. वाय पाटील स्टेडीयमही सुटला नाही. स्टेडीयमवर महामार्गालगत असणारी लोखंडी पत्रा त्याच्या सांगाड्यासहीत उडून गेला. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ आणि सीबीडी-बेलापूर या भागात संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 32 झाडे कोसळल्याची नोंद महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली. पनवेल महापालिका हद्दीत  खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल परिसरात तब्बल 48 झाडे कोसळून वाहने आणि इमारतींच्या संरक्षक भींतींचे नुकसान झाले. 

सामनाच्या फ्रंट पेजवरील सूचक जाहिरात म्हणतेय, "हे ज्यांनी केले, त्यांचा मला अभिमान आहे !"

वाहतुकीचा खोळंबा

पामबीच मार्गावर नेरूळ आणि बेलापूर जवळ काही झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तसेच कोपरखैरणे आणि ऐरोली भागातही झाडे कोसळल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बेलापूर आणि खारघर दरम्यान विजेचा खांब रस्त्यावर पडला होता. तळोजा पेट्रोल पंप ते पल्लवी हॉटेल दरम्यान रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती.
---
संपादन : ऋषिराज तायडे