स्वतःच्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी; बाळासाहेब थोरातांनी भाजप नेत्यांना सुनावलं!

 स्वतःच्या मतदारसंघात जाऊन जनतेला मदत करा;  बाळासाहेब थोरातांनी भाजप नेत्यांना सुनावलं!
स्वतःच्या मतदारसंघात जाऊन जनतेला मदत करा; बाळासाहेब थोरातांनी भाजप नेत्यांना सुनावलं!

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कोरोना संकटाचा खंबीरपणे सामना करत असताना राज्यात अस्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी आटापीटा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे हसे झाले आहे. त्यामुळे वारंवार राज भवनच्या अंगणात जाण्याची सवय लागलेल्या भाजप नेत्यांनी स्वतःच्या अंगणात म्हणजेच मतदारसंघात जाऊन जनतेला मदत करावी, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. 

कोरोनाच्या संकटात राजकारण न करता सहकार्याची भूमिका घ्या. या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी साथ दिली आहे. मात्र, मोदींच्या पक्षाचे राज्यातील नेतेच त्यांच्या आवाहनाला बगल देत राज्यात राजकारण करण्यात आकंठ बुडाले आहेत. सत्ता गेल्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त झाले असून, सत्तेसाठी त्यांची तडफड होत आहे. विरोधी पक्षाने कोरोनाच्या संकटात सरकारला काही विधायक सूचना केल्या तर त्यांचे स्वागतच केले जाईल; परंतु त्यांना राजकारणच करायचे असल्याने रोज राज भवनाच्या फेऱ्या मारून आता त्यांनी घरच्या अंगणालाच रणांगण केले आहे, असेही थोरात यावेळी म्हणाले. 

आंदोलनाचा बार फुसका 
चंद्रकांत पाटील यांचे खरे आंगण कोणते? पुणे की कोल्हापूर? देवेंद्र फडणवीस तरी त्यांच्या नागपूरला गेले का? त्यांच्या मतदारसंघात कॉंग्रेसचे कार्यकर्तेच मदत करत आहेत. पाच वर्षे सत्तेत असताना राज्याची फसवणूक करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव पूर्णपणे फसला असून, या "मेरा आंगण मेरा रणांगण' या आंदोलनाचा बार फुसका ठरला आहे. या आंदोलनाला जनतेचा तर नाहीच, पण भाजप कार्यकर्त्यांचाही प्रतिसाद मिळाला नाही, अनेक ठिकाणी भाजप नेत्यांनी रखरखत्या उन्हात लहान मुलांना आंदोलनासाठी उभे करून वेठीस धरल्याचे पाहायला मिळाले. 

हे कुठले शहाणपण आहे? 
संकटात असणाऱ्या राज्याला राजकीय रणांगण बनवणे हे कुठले शहाणपण आहे? राजकारणासाठी आयुष्य पडले आहे, आजची वेळ निर्धाराने आणि एकजुटीने लढण्याची आहे. इतिहास भाजपची आजची ही काळी कृती कधीही विसरणार नाही. कोरोनाच्या लढाईत सरकार, प्रशासन, डॉक्‍टर, परिचारिका, पोलिस दल, सफाई कामगार यांच्यासह विविध क्षेत्रांतले लोक व सामाजिक संस्था जीवाची पर्वा न करता अहोरात्र आपले योगदान देत आहेत. अशा वेळी एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून सत्ता मिळवण्याची धडपड करण्यापेक्षा भाजप नेत्यांनी गरीब जनतेला मदत करावी, असेही थोरात यावेळी म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com