#HopeOflife : असा करूयात कर्करोगाला प्रतिबंध

cancer
cancer

मुंबई : सर्व प्रकारच्या कर्करोगांमधील ३० ते ५० टक्के प्रकरणे टाळणे शक्‍य असते. प्रतिबंध हीच कर्करोगाच्या नियंत्रणाची सर्वांत प्रभावी आणि किफायतशीर दीर्घकालीन उपाययोजना ठरते. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली स्वीकारणे आवश्‍यक आहे. याबाबत जनजागृतीसाठी राष्ट्रीय स्तरावर धोरणे आखून विविध उपक्रम राबवले पाहिजेत.

तंबाखू
कॅन्सरमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूंसाठी तंबाखू हा सर्वांत मोठा टाळण्याजोगा धोका आहे. तंबाखूमुळे उद्‌भवणारा कर्करोग आणि अन्य आजारांमुळे दरवर्षी ६० लाख जण मृत्युमुखी पडतात. तंबाखूच्या धुरात ७००० हून अधिक रसायने असतात; त्यापैकी किमान २५० रसायने घातक आणि ५० हून अधिक रसायने कर्करोगकारक असल्याचे समोर आले आहे. धूम्रपानामुळे फुप्फुस, अन्ननलिका, स्वरयंत्र, तोंड, घसा, मूत्रपिंड, मूत्राशय, स्वादुपिंड, उदर आणि गर्भाशयमुखाचा कर्करोग होऊ शकतो. तंबाखूच्या धुरामुळे (सेकंड-हॅंड स्मोक) धूम्रपान न करणाऱ्यांनाही फुप्फुसाचा कर्करोग होतो, असे सिद्ध झाले आहे. तंबाखू खाण्यामुळे तोंड, अन्ननलिका आणि स्वादुपिंडाच्या कर्करोगाची शक्‍यता असते.

मद्यपान
मुखविवर, घशाची पोकळी, स्वरयंत्र, अन्ननलिका, यकृत, मोठे आतडे, गुदाशय आणि स्तनाचा कर्करोग होण्यात मद्यपान हा एक महत्त्वाचा घटक आहे. मद्यपान वाढल्यास कर्करोगाचा धोकाही वाढतो. मद्यपानाचे मोठे प्रमाण आणि सोबत तंबाखूसेवन यामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगांची जोखीम मोठ्या प्रमाणात वाढते. मद्यपानाशी निगडित कर्करोगामुळे २०१० मध्ये जगभरात तीन लाख ३७ हजार ४०० व्यक्तींचा मृत्यू झाला; त्यापैकी बहुसंख्य पुरुष होते. 

जंतुसंसर्ग
२०१२ मध्ये कर्करोगाची १५ टक्के प्रकरणे हेलिओबॅक्‍टर पायलॉरी, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही), हिपॅटायटिस बी व सी आणि एपस्टाईन-बार विषाणू आदी रोगजंतूंच्या संसर्गाशी संबंधित होती. जंतुसंसर्गामुळे उद्‌भवलेल्या कर्करोगाचे प्रमाण वेगवेगळ्या देशांत भिन्न होते. हे प्रमाण ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलॅंड, अमेरिका, पश्‍चिम व उत्तर युरोपीय देशांत पाच टक्‍क्‍यांहून कमी; तर आफ्रिकेतील सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील काही देशांत ५० टक्‍क्‍यांहून अधिक होते. संसर्गामुळे झालेल्या कर्करोगाचे दोन तृतीयांश म्हणजे १४ लाख रुग्ण अविकसित देशांत आढळले. हिपॅटायटिस बी विषाणू आणि ह्युमन पॅपिलोमा व्हायरसवर लसी उपलब्ध आहेत; त्यामुळे अनुक्रमे यकृत आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.

शारीरिक निष्क्रियता, अयोग्य आहार, लठ्ठपणा
कर्करोग प्रतिबंधाचा आणखी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे आहारात योग्य बदल करणे. लठ्ठपणा व जास्त वजन आणि अन्ननलिका, मोठे आतडे, गुदाशय, स्तन, गर्भाशयाचा अंत:स्तर आणि मूत्रपिंड आदी अवययांचा कर्करोग यांच्यात दुवा आहे. आहारात फळे आणि भाज्यांचे प्रमाण अधिक असल्यास त्यापैकी अनेक प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण होऊ शकते. नियमित शारीरिक श्रम, योग्य वजन आणि संतुलित आहारामुळे कर्करोगाचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होतो. योग्य आहारामुळे कर्करोग आणि अन्य संसर्गजन्य रोगांचाही धोका कमी होऊ शकतो. 

पर्यावरणातील प्रदूषण
वायुप्रदूषणाचा समावेश मानवांसाठी कर्करोगकारक प्रवर्गात केला जातो. हवेतील प्रदूषणाने २०१२ मध्ये जगभरात तब्बल ३२ लाख व्यक्तींचा अकाली मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. त्यापैकी दोन लाखांहून अधिक जण फुप्फुसाच्या कर्करोगाचे बळी होते. त्याव्यतिरिक्त घरात स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या जळणाच्या धुरामुळे ४० लाखांहून अधिक व्यक्तींचा अकाली मृत्यू होतो. त्यापैकी सहा टक्के व्यक्ती फुप्फुसाच्या कर्करोगाने दगावतात. घरातील कोळशाच्या धुरामुळे फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका, विशेषत: धूम्रपान न करणाऱ्या महिलांसाठी दुपटीने वाढतो. अफ्लाटॉक्‍सिन्स किंवा डायॉक्‍सिन्स अशा घटकांनी प्रदूषित झालेल्या अन्नपदार्थांतही कर्करोगकारक घटक आढळतात. 

किरणोत्सर्ग/प्रारण (रेडिएशन)
नैसर्गिक आणि मानवनिर्मित स्रोतांपासून होणारा आयनकारी किरणोत्सर्ग अथवा प्रारणामुळे रक्ताचा कर्करोग आणि विविध प्रकारच्या अर्बुदांची, कर्करोगाच्या गाठी होण्याची शक्‍यता वाढते. त्यातही कमी वयात आणि मोठ्या प्रमाणात आयनकारी किरणोत्सर्गाशी संपर्कात आल्यास कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) आणि विशेषत: सौर (सोलार) प्रारणे मानवासाठी कर्करोगकारक असतात. त्यामुळे बेसल सेल कार्सिनोमा, स्क्वॉमस सेल कार्सिनोमा आणि मेलानोमा अशा सर्व प्रकारचे त्वचेचे कर्करोग होण्याची शक्‍यता असते. त्वचा रापवण्यासाठी वापरली जाणारी अतिनील प्रारणे उत्सर्जित करणारी उपकरणेही कर्करोगकारक प्रवर्गात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यांच्या अतिवापरामुळे मेलानोमा कॅन्सर होण्याची शक्‍यता असते.

वैद्यकीय उपचारांतील रेडिएशनच्या वापरामुळे रुग्णाचा जीव वाचवणे शक्‍य होते आणि शरीरात वायर, उपकरणे टाकणे (इन्व्हेजिव्ह) अथवा शस्त्रक्रियेसारखी प्रक्रिया टाळता येते. तथापि, अनावश्‍यक अथवा अवांछित असताना रेडिएशनचा वापर करणे अयोग्य आणि रुग्णासाठी घातक ठरू शकते. आवश्‍यकता असल्यासच रुग्णाला रेडिओलॉजिक चाचण्या आणि प्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला पाहिजे आणि विशेषत: बालकांना प्रारणांची अनावश्‍यक-अतिरिक्त मात्रा दिली जाऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. 
माती आणि बांधकाम साहित्यात कधीकधी आढळणाऱ्या रेडॉन या नैसर्गिकरित्या किरणोत्सर्गी वायूची घरातही बाधा झाल्यास फुप्फुसाच्या कर्करोगाची शक्‍यता वाढते. हा धोका टाळण्यासाठी वायुवीजनात सुधारणा करून व फरसबंदी आणि भिंती सील करून घरातील रेडॉनची पातळी कमी करता येते.

---
मद्यपानाशी निगडित कर्करोगामुळे २०१० मध्ये जगभरात ३,३७,४००
व्यक्तींचा मृत्यू

संसर्गामुळे झालेल्या कर्करोगाचे १४ लाख रुग्ण अविकसित देशांत
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com