मुंबईत कोविड रुग्णसंख्या घटली, खासगी रुग्णालयात ICU खाटा रिकाम्या

भाग्यश्री भुवड
Wednesday, 28 October 2020

कोविड रुग्णांच्या संख्येत गेल्या काही आठवड्यापासून घट झाल्या कारणाने खासगी रुग्णालयातील आयसीयू बेड्स मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

मुंबई - कोविड रुग्णांच्या संख्येत गेल्या काही आठवड्यापासून घट झाल्या कारणाने खासगी रुग्णालयातील आयसीयू बेड्स मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. गेल्या आठवड्यापासून रुग्णांना तात्काळ दाखल करुन घेण्याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. 
मुंबईच्या खासगी रुग्णालयात रुग्णांच्या उपचारांचा प्रतिक्षा कालावधी दोन ते तीन दिवसांचा होता. मात्र, रुग्णांची संख्या कमी झाल्याने खासगी रुग्णालयांवरील भार कमी झाला आहे. 

गेल्या आठवड्याभरात रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोविड-19 रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे आणि त्यांच्या ICU विभागात असणार्‍या ICU बेड्सही रिक्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

माहीममधील एस एल रहेजा रुग्णालयात गेल्या आठवड्यापर्यंत कोविड-19 चे दररोज 15 ते 20 रूग्ण दाखल होत होते. मात्र, या रविवारी फक्त दोनच रुग्ण आढळले. रुग्णालयाच्या 10 खाटांच्या आयसीयूमध्ये सोमवारी एक बेड रिक्त होता. संपूर्ण रुग्णालयात कमीतकमी 45 आयसोलेशन बेड रिक्त होते. वैद्यकीय संचालक डॉ. हिरेन आंबेगावकर यांनी सांगितले की, “आठवड्यापूर्वी आमच्याकडे आयसीयूची प्रतिक्षा यादी होती. मात्र, आता ती कमी झाली आहे."

महत्त्वाची बातमी : टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रावर मुंबईत जीवघेणा हल्ला; कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु

कोविडचे नवीन रुग्ण दाखल करण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्ये आता सामान्य वार्डात बरेचसे बेड रिक्त आहेत. आता आयसीयू रूग्णांची प्रतीक्षेचे कालावधी फक्त 6-8 तासांवर आहे, काही दिवसांपूर्वीच्या 4-5 दिवस होता.

- डॉ. ओम श्रीवास्तव, संसर्गजन्य रोग तज्ज्ञ 

राज्य आणि मुंबईमध्ये नव्या कोविड रुग्णांची सातत्याने घट होत आहे. मागील आठवड्यांच्या तुलनेत नवीन आणि सक्रिय प्रकरणांमध्ये तीव्र घट झाली आहे. राज्य आरोग्य अधिका-यांनी सांगितले की, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेडची एकूण आवश्यकता कमी झाली आहे. महानगरपालिकेच्या 25 ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमधील 427 रिकाम्या आयसीयू बेड्स दाखवण्यात आले. त्यातील 262 खासगी रुग्णालयातील होते. आणखी 104 व्हेंटिलेटर बेड्स खासगी रुग्णालयातील रिक्त होते. पालिकेच्या डॅशबोर्डने 1,148 कोविड -9 रुग्ण सध्या गंभीर असल्याचे दर्शवले आहे. मात्र, अजूनही सार्वजनिक आणि खासगी समर्पित कोविड रुग्णालयात एकूण 42 टक्के बेड्स रिक्त आहेत. 

ग्रँट रोडच्या भाटिया रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून आयसीयूसाठी एक ही रुग्ण नाही. मुख्य इंटेनटीव्हीस्ट डॉ. गुंजन चंचलानी यांनी सांगितले की, मार्चपासून काही दिवसांपूर्वीच ती आयसीयू प्रवेशासाठी रूग्णांची यादी घेऊन फिरत होत्या. आमच्याकडे कधीच आयसीयू बेड रिक्त नव्हता. एका डिस्चार्जच्या अर्ध्या तासाच्या आत दुसरा रुग्ण तिथे उपचारांसाठी यायचा. आता आमच्याकडे एक ते दोन बेड रिकामे आहेत आणि वॉक-इन रूग्णही दाखल करून घेऊ शकतो. 

महत्त्वाची बातमी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता; BMC कडून 50 हजार खाटांची तयारी 

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयातही रुग्णांमध्ये 25 टक्के घट झाली आहे. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संतोष शेट्टी यांनी सांगितले की, “आमच्याकडे काही आयसीयू बेड रिक्त आहेत. यापूर्वी एवढे कधी नव्हते. आमच्याकडे नेहमीच रूग्णांना उपचारांसाठी रांगेत उभे राहावे लागत होते." 

दरम्यान, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात सक्रिय संक्रमणाची नोंद झाली आहे. मुंबई, पूर्व उपनगराचा समावेश असलेल्या टी, एन आणि एस प्रभागात कोविडचे रुग्ण आढळत आहेत. या भागातील केसलोडचे प्रमाण जास्त असल्यामुळे काही खासगी रुग्णालयांमध्ये आयसीयू पूर्ण क्षमतेने चालू आहेत. मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड्स रिक्त नाहीत आणि त्यासाठी सतत चौकशी केली जाते. बेड रिक्त होताच लगेचच नवीन प्रवेश घेतला जातो. 

महत्त्वाची बातमी  "तब्बल वीस हजार कोटी रुपयांचा रेडीरेकनर दरकपात घोटाळा", राज्यपालांना पत्र

हिरानंदानी रुग्णालयात 20 आयसीयू बेड्स आहेत, ते पूर्णपणे भरलेले आहेत. रुग्णालयाचे व्यवस्थापक भावेश फोफरिया म्हणाले की, गेल्या चार दिवसांत कोविडच्या नवीन प्रकरणांमध्ये घट झाली आहे. सध्या 24 बेड्स रिक्त आहेत, यापूर्वी एवढ्या संख्येने बेड्स रिक्त नव्हते.

( संपादन - सुमित बागुल )

ICU beds are vacant in various hospitals of mumbai covid 19 cased dropped in the city 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ICU beds are vacant in various hospitals of mumbai covid 19 cased dropped in the city