
लॉकडाउन त्यात वादळाचा तडाखा यामुळे जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
नवी मुंबई: पश्चिम किनारपट्टीवर (West Coast) गेले दोन दिवस थैमान घातलेल्या तौत्के चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) मच्छिमारांचे अतोनात नुकसान झाले आहे. होड्या, जाळे आणि मासेमारी थांबल्याने उपासमार ओढावली आहे. अशा मच्छिमार कुटुंबियांचे (Fisherman) तात्काळ पंचनामे करून सरकारने नुकसान भरपाई करावी, अशी मागणी भाजप (BJP) मच्छिमार सेलचे अध्यक्ष व कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष चेतन पाटील यांनी राज्य सरकारकडे केली. सरकारने त्वरित मदतीसाठी पावले न उचलल्यास सरकारविरोधात आक्रोष आंदोलन करू, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. (If the government does not help fishermen we will agitate against MVA govt Warns BJP)
काही महिन्यांपूर्वी आलेल्या महा आणि क्यार या वादळानंतर कोरोना महामारीने देशात शिरकाव केला. हे कमी होते की काय तर या दरम्यान निसर्ग चक्रीवादळाच्या कचाट्यात मच्छिमार सापडला. याच काळात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्यामुळे मच्छीमारांचे कंबरडेच मोडले आहे. अशा परिस्थितीलाही खंबीरपणे तोंड देत मच्छिमार बांधव समुद्रात जीव धोक्यात घालून मासेमारी करीत आहेत. राज्यातील नागरीकांना मासे पुरवण्याची सेवा अविरतपणे देत आहेत. कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये हा मच्छीमार बांधव गेल्या दोन वर्षापासून संकटात सापडला आहे. त्यातच महाराष्ट्र सरकारकडून वेळोवेळी मदत न मिळाल्याने आता त्यांचे समोर त्यांच्या उपजीविकेचे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. कोळी महासंघातर्फे भाजपचे आमदार रमेश पाटील हे गेले दोन वर्षे मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करीत आहोत. भाजप व संघटनेतर्फे सतत पाठपुरावा सुरू आहे. परंतु आजपर्यंत सरकारने मच्छीमारांच्या तोंडाला फक्त पान पुसली आहेत, असा आरोप ॲड. चेतन पाटील यांनी केला आहे.
तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांचे खूप नुकसान झाले. त्यांच्या होड्या, जाळे, घरे, फळबागा तुटल्या असल्याने मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच स्थानिक कलेक्टर यांनी नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी चेतन पाटील यांनी केली आहे. निसर्ग चक्रीवादळामध्ये रायगडच्या परवाने अधिकाऱ्यांनी व सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्ताने येथील सातशे ते आठशे बोटींचे परवाने व्हीआरसी नुतनीकरण न केल्याने त्यांना निसर्ग चक्रीवादळामध्ये नुकसानभरपाईसाठी दावा करता आलेला नाही. याची सर्वस्व जबाबदारी रायगड जिल्ह्यातील परवाना अधिकारी व सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त हे आहेत. या सर्वांची तक्रार मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे व सहआयुक्त राजेंद्र जाधव यांना करून सुद्धा आज रोजी पर्यंत त्या विषयावरती त्यांनी तोडगा काढलेला नाही. असे अनेक प्रकार या अधिकाऱ्यांच्या व मत्स्य व्यवसाय विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मच्छीमार बांधवांना हे नुकसान सोसावे लागत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.
जे मच्छीमार बांधव बेपत्ता झाले आहेत. किंवा वादळात मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयाची सरकारने त्वरीत मदत करावी अशी मागणी चेतन पाटील यांनी केली आहे. बोटींचे, जाळ्यांचे, घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. अशांना त्वरित आर्थिक मदत ही सरकारने करावी अन्यथा भाजपच्या मच्छीमार सेलच्या वतीने सर्व मच्छीमार बांधव मंत्रालयावर आक्रोश मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा चेतन पाटील यांनी दिला आहे. सरकारला मच्छिमार आणि कोळी समाजाची फक्त निवडणूकीच्या वेळेस आठवण येते. नंतर सरकारला त्यांचा विसर पडत आहे. याचे मूर्तीमंत उदाहरण नुकसानभरपाई न देणे हे आहे असा आरोप चेतन पाटील यांनी केला.
(संपादन- विराज भागवत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.