शाब्बास ! IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बनवलं स्वतःचं नॅव्हिगेशन तंत्रज्ञान.. 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

ओला, उबेर, स्विगी यासारख्या कंपन्यांमध्ये किंवा गुगलच्या माध्यमातून व्यावसायिक आणि वैयक्तिक वापरासाठी नॅव्हिगेशनचा वापर करण्यात येतो.

मुंबई : ओला, उबेर, स्विगी यासारख्या कंपन्यांमध्ये किंवा गुगलच्या माध्यमातून व्यावसायिक आणि वैयक्तिक वापरासाठी नॅव्हिगेशनचा वापर करण्यात येतो. त्याचबरोबरच देशाची सीमा, सुरक्षा आणि आपत्कालिन परिस्थितीसाठीही या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सर्वसामान्यांपासून देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या असलेल्या नॅव्हिगेशन तंत्रज्ञानात आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन करत देशाला आत्मनिर्भर बनवण्याकडे पाऊल टाकले आहे.

जगातील अनेक देशांचे पृथ्वीभोवती उपग्रह सोडले आहेत. या उपग्रहातून येणार्‍या रेडिओ लहरीतून महत्त्वपूर्ण अशा माहितीचे प्रक्षेपण या उपग्रहातून होत असते. उपग्रहाच्या माध्यमातून पाठवण्यात येणार्‍या लहरींच्या आधारे दिशा दाखवण्याचे काम नॅव्हिगेशनच्या माध्यमातून केले जाते. आजवर अनेक देशांनी अवकाशामध्ये आपले नेव्हीगेशन सॅटेलाईट सिस्टिम तैनात केले आहेत. यामध्ये युनायटेड स्टेटचे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस), रशियन फेडरेशनचे ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम (ग्लोनास), युरोपचे गॅलेलिओ, चीनचे बीडोयू आणि जपानचे क्वासी-झेनिथ सॅटेलाईट सिस्टिम (क्यूझेडएसएस) नॅव्हिगेशन सॅटेलाईट आहेत.

BJP नंतर आता NCP च्या या 'बड्या' नेत्याने केली सुशांतसिंग राजपूत आत्महत्येच्या सखोल चौकशीची मागणी...

भारतानेही स्वत:चे देशी बनावटीचे इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम (आयआरएनएसएस) किंवा नॅव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन (नाविक) हे परदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे बनवलेले नॅव्हिगेशन सिस्टिम अवकाशात सोडले आहे. 

1999 मधील कारगिलच्या युद्धात शत्रूची स्थिती समजण्यासाठी भारताला परदेशी जीपीएस सॅटेलाईटवर अवलंबून राहावे लागले होते. त्यामुळे संबंधित देशाकडून माहिती मिळेपर्यंत परिस्थिती बदललेली असे. यातूनच भारताला स्वत:चे सॅटेलाईट विकसित करण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यामुळे कारगिल युद्धानंतर अवघ्या काही वर्षातच भारताने इस्रोच्या माध्यमातून स्वत:चे आयआरएनएसएस किंवा नाविक सॅटेलाईट अवकाशात सोडले. परंतु सॅटेलाईटमधून पाठवण्यात येणारे व्यावसायिक लहरींसाठी आवश्यक असलेली व्यावसायिक चीप आपल्याकडे नसल्याने आपल्याला पुन्हा अन्य देशांवर विसंबून राहावे लागत आहे. यातूनच आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी नाविक आणि जीपीएसच्या सॅटेलाईटच्या माध्यमातून नागरी परिस्थिती दर्शवण्यासाठी ‘ध्रुवा’ ही आरएफ फ्रंट-एंड इंटीग्रेटेड सर्किट (आयसी चीप) ही चीप तयार केली आहे. सॅटेलाईट हे पृथ्वीपासून फार दूर असतात त्यामुळे अनेकदा त्यांच्याकडे येणारे सिग्नल हे फारच कमकुवत असतात. या चीपमुळे सिग्नलमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. 1.176 गिगाहट्झ, 1.227 गिगाहट्झ, 1.575 गिगाहट्झ, 2.492 गिगाहट्झ अशा विविध फ्रिक्वन्सीला नॅव्हिगेशन सिग्नलचे प्रक्षेपण करण्याची क्षमता ध्रुवा आयसीमध्ये आहे.

मोठी बातमी'या' रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करता येणार नाही; आरोग्यमंत्र्यांची महत्वपुर्ण माहिती

ध्रुवा चीप ही पूर्णत: पीएचडी आणि एम.टेकच्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. या टीममध्ये विजय कंचेटला, संतोष ख्यालिया, अजिंक्य खारलकर, शुभम जैन, स्वेथा जोस, जेफीन जॉय, सयद हमीद, मुकुल पांचोली, सुमीत खालापुरे, अमितेश त्रिपाठी, प्रवीण खन्ना आणि साक्षी वस्त्राड यांचा समावेश आहे. प्राध्यापक राजेश झेले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही चीप तयार केली आहे. 18 महिन्यांपासून विद्यार्थी यावर काम करत आहेत. या चीपची विद्यार्थ्यांनी संपूर्ण तपासणी आणि चाचणी प्रयोगशाळेत केली आहे. लॉकडाऊन होण्यापूर्वी आयआयटी मुंबईकडून या चीपची यशस्वी चाचणी घेण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी मंत्रालयाने या प्रकल्पाला निधी दिला आहे. 

आणखी काही वैशिष्ट्यांसह ध्रुवा चीप ही अधिक अत्याधुनिक बनवण्यावर सध्या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांकडून काम करण्यात येत आहे. ध्रुवाला नाविकमध्ये वापरण्यास भारत सरकारने मान्यता दिल्यानंतर ते मोबाईल आणि व्यावसायिक अ‍ॅपमध्येही उपलब्ध होऊ शकते. 

18 महिन्यांच्या मेहनतींनतर विद्यार्थ्यांना मिळालेले यश हे अविश्वसनीय आहे. आम्ही या प्रकल्पाला शून्यातून सुरुवात केली होती. पर्यावरणात येणार्‍या अडचणींचा सामना करणारे अनेक डिझाईन विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी केलेले हे संशोधन आपल्याला आत्मनिर्भरतेकडे नेणारे आहे. - प्रा. राजेश झेले, आयआयटी मुंबई

iit bombay developed its own navigation system like google


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: iit bombay developed its own navigation system like google