esakal | बेकायदा फेरीवाले व बांधकामांवर हातोडा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बेकायदा फेरीवाले व बांधकामांवर हातोडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : सुनियोजित शहराच्या नियोजनाला बाधा पोहोचवणाऱ्या अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाले यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश महापालिका (Municipal) आयुक्त अभिजित बांगर (Abhijit Bangar) यांनी दिले. कोविड (Covid) आणि सणासुदीच्या काळात गैरफायदा घेऊन अनधिकृत (Unauthorized) बांधकाम करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याच्या सूचना बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातील बेकायदा बांधकामाचा आढावा घेण्यासाठी बांगर यांनी बैठक बोलावली होती. या दरम्यान बांगर यांनी तक्रारीची वाट न पाहता स्वतः कारवाई करण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये सध्या सुरू असलेल्या बांधकामांना बजावलेल्या नोटिसांचा विभागनिहाय आढावा बांगर यांनी घेतला. एकदा नोटीस देऊन बांधकाम निष्कासित केल्यावर एफआयआर दाखल होऊनही जर पुन्हा बांधकाम केले जात असेल, तर ते गंभीरतेने घेऊन आयपीसी कलमाद्वारे गुन्हा दाखल करावा, असे आदेश बांगर यांनी दिले. कायद्याला न जुमानता अशा प्रकारे एकदा कारवाई करूनही पुन्हा व्यवस्थेला गृहीत धरून दुसऱ्यांदा नियमांचा भंग केल्याचा आढळल्यास ही बाब गंभीरतेने घ्या. अशा बांधकामधारकांची स्वतंत्र यादी तयार करून पोलिस आयुक्तांकडे सादर करा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरिश पटनिगिरे, तसेच सर्व विभागांचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी व अतिक्रमण विभागाचे सर्व विभागातील अभियंते उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे - बॅंकेच्या ग्राहकांचा गोपनीय डेटा चोरीप्रकरणी संगणक अभियंते गजाआड

कारवाईचे वेब ॲप्लिकेशन

नोटिशीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या बांधकाम निष्कासनाची कारवाई करतानाचे छायाचित्रण करून संगणक विभागाच्या सहकार्याने एक वेब ॲप्लिकेशन तयार करण्यात यावे. आढावा बैठकीप्रसंगी या कारवाईचे सादरीकरण करण्यात यावे, असे आयुक्तांनी सांगितले. अनधिकृत इमारतींची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी अशा इमारतींसमोर प्रसिद्ध करण्यात आलेले फलक काढून टाकले जातात. ही बाब गंभीरपणे घेण्यासारखी असून, याबाबत ठोस कारवाई करावी, असे निर्देशही देण्यात आले.

फेरीवाल्यांवरील कारवाया तीव्र

फेरीवाल्यांचा उपद्रव नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. हे नवी मुंबईसारख्या शहराला साजेसे नसून रहदारी व वाहतुकीला अडथळा पोहचवणाऱ्या फेरीवाल्यांविरोधातील कारवाया अधिक तीव्र स्वरूपात राबवाव्यात, असेही आदेश बांगर यांनी दिले

loading image
go to top