राज्यातील नागरिकांमध्ये कोरोना विषाणू विरोधातील प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नाही; ICMR च्या सिरो-सर्व्हे'मधील निष्कर्ष..

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

कोरोना संसर्ग पसरून चार महिने झाले असले तरी अद्याप कोरोना विषाणूंचा सामना करणारी प्रतिकारशक्ती विकसित झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई: कोरोना संसर्ग पसरून चार महिने झाले असले तरी अद्याप कोरोना विषाणूंचा सामना करणारी प्रतिकारशक्ती विकसित झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लोकांना शारिरिक अंतर राखणे, हातांची स्वच्छता, मास्क वापरणे यांसारख्या उपाययोजनांवर भर देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. मात्र लोकांमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण अत्यल्प असल्याची दिलासादायक समोर आली आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ( आय सी एम आर ) यांच्यावतीने मे 2020 मध्ये देशातील 83 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो-सर्व्हे करण्यात आला.  त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली  या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोनाचा कितपत प्रसार झाला आहे, हे जाणून घेण्याकरता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या जिल्ह्यामधे रॅन्डम पध्दतीने निवडलेल्या 10 समुहातील प्रत्येकी 40 जणांची अशी एकूण 400 लोकांच्या रक्ताची तपासणी  राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात आली असून या प्रकारे या व्यक्तींच्या रक्तद्रवामधील प्रतिपिंडांचा ( ॲन्टीबॉडी) शोध घेण्यात आला आहे.

सर्वात मोठी बातमी - मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट...

 राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असून लॉकडाऊन धोरण यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. परंतू याचा दुसरा अर्थ राज्यातील बहुसंख्य लोकसंख्येमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने अद्याप प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  कोरोना प्रतिबंध व नियंत्रणासाठी खबरदारीच्या उपाययोजनांवर भर देणे महत्वाचे असून लोकांना शारिरिक अंतर राखणे, हातांची स्वच्छता, श्वसनसंस्थेची स्वच्छता,  नेहमी स्पर्श होणा-या पृष्ठभागाची स्वच्छता या उपायांवर भर देणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळातही  प्रभावी सर्वेक्षण आणि काटेकोर कंटेनमेंट धोरण यावर भर देणे आवश्यक राहणार आहे.   

राज्यात सध्या 55 शासकीय आणि 42 खाजगी अशा एकूण 97 प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6 लाख 69 हजार 994 नमुन्यांपैकी  1 लाख 10 हजार  744 नमुने पॉझिटिव्ह (16.52 टक्के) आले आहेत. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1,10,744 वर पोहोचली आहे. मात्र त्यातील 80 टक्के व्यक्तींना कोणतीही लक्षणे नव्हती. कोरोना चाचणी नंतर अश्या व्यक्तींमध्ये संसर्गाची लक्षणे अत्यल्प प्रमाणात आढळून आली आहेत. 

हेही वाचा: ऑनलाइन शिक्षणामुळे यंदा टॅब, सेकंडहॅन्ड मोबाइलला सुगीचे दिवस

अश्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यावर भर देण्यात येत आहे.राज्यात 5 लाख  89 हजार  158 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 1547 संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये  80 हजार 670 खाटा उपलब्ध असून सध्या 28 हजार 84 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
immunity power not developed till now in people in maharashtra against corona 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: immunity power not developed till now in people in maharashtra against corona