महत्त्वाची बातमी - जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कसा असेल पाऊस, जाणून घ्या..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस मुंबईत काही ठिकाणी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई- काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस मुंबईत काही ठिकाणी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. एका आठवड्याच्या ब्रेकनंतर या आठवड्याच्या शेवटी पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. जूनमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. मुंबईत पावसानं हजेरी लावली, मात्र एका आठवड्यांपासून पावसानं दडी मारली आहे. रविवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून 24 तासात भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) सांताक्रूझ वेधशाळेत 27.2 मिमी पावसाची नोंद झाली. जो मध्यम श्रेणीमध्ये येतो. कुलाबा स्थानकात 2.2 मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी मात्र पाऊस पडला नाही.

पुढील आठवड्यात पाऊस मुंबईत परतणार असून, 2 ते 4 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान 3 आणि 5 जुलैच्या सुमारास पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीप्रमाणे, सोमवारी काही ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच पुढील चार दिवसात मुंबई आणि उपनगरात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी आणि मंगळवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत मुंबईत 18 जूनला फक्त एकदाच जोरदार पाऊस पडला आहे. आयएमडीने शहरात पावसाचं आगमन झाल्याची घोषणा केल्यानंतर उपनगरामध्ये 41 मिमी आणि दक्षिण मुंबईत 44 मिमी पाऊस पडला. नैऋत्य मॉन्सूनने 14 जूनला मुंबईला व्यापून टाकलं होतं, मात्र शहरात अद्याप मुसळधार पाऊस झालेला नाही. 

मोठी बातमीठाण्यात 2 ते 12 जुलैपर्यंत पुनश्च लॉकडाऊन; महापालिका आणि पोलिस आयुक्तांच्या बैठकीत निर्णय...

गेल्या 24 तासात झाला इतका पाऊस

सांताक्रूझ येथे 493.1 मिमी सरासरीच्या तुलनेत जून महिन्यात 363 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरात केवळ आतापर्यंत 130 मिमी पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार पावसाचं प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये 840.7 मिमी महिन्याच्या सरासरीसह सर्वाधिक पाऊस पडतो.  

18 जूनपासून मुंबईसह महाराष्ट्रात सखोल भागासाठी पावसासंबंधी कोणत्याही प्रकारचा महत्त्वाचा बदल दिसून आला नाही. जून-अखेरपासून राज्यात पाऊस पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे जुलैच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानशास्त्रज्ञ आणि युनिर्व्हसिटी ऑफ रिडिंग, युनायटेड किंगडम (यूके)  हवामानशास्त्र विभागातील पीएचडी संशोधक अक्षय देवरस यांनी वर्तवला आहे.

मोठी बातमी - अलार्म वाजवायचा नाही म्हणून धमकावलं, हॉस्पिटलमधील इंटर्न डॉक्टरसोबत केला लंपटपणा आणि...

असा असेल यंदाचा पाऊस, हवामान विभागाचा अंदाज 

यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 96 ते 100 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. एप्रिल महिन्यात आयएमडीने यंदाच्या मान्सूनबाबत पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.

important news about mumbai monsoon check weather forecast for coming week  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: important news about mumbai monsoon check weather forecast for coming week