ऑपरेशन ऑलआऊटचा महत्त्वाचा टप्पा, मुंबई पोलिस 25 टॉप वॉन्टेड आरोपींची यादी बनवणार

अनिश पाटील
Friday, 18 December 2020

एक पोलिस एक आरोपी योजनेच्या माध्यमातून आरोपींच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार

मुंबई : लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प पडल्यानंतर आता गुन्हेगार पुन्हा या काळाधंद्यांकडे वळले असून अशा सराईत आरोपींना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिस विशेष प्रतिबंधात्मक मोहिम राबवणार आहे. त्यासाठी वॉन्डेट आरोपी पकडण्यासाठी विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. याशिवाय 25 टॉप आरोपींची यादी तयार करून एक पोलिस एक गुन्हेगार अशी मोहिम राबवण्यात येणार आहे.

वॉन्टेड आरोपींबाबत विशेष मोहिम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस ठाण्यांच्या पातळीवर 25 सराईत आरोपींची यादी तयार करण्यात येणार असून एक पोलिस एक गुन्हेगार या योजने अंतर्गत या गुन्हेगारांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. नुकताच राबवण्यात आलेला ऑपरेशन ऑलआऊट याच मोहिमेचा भाग असल्याचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले.

गँगस्टर, सराईत सायबर गुन्हेगार, आर्थिक गुन्हेगार, जबरी चोरी, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांमधील वॉन्डेट आरोपींसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येणार आहे. वॉन्डेट आरोपींच्या यादीची अनेक वर्षांपासून पडताळणी झालेली नाही. त्यामुळे या यादीची पुनर्पडताळणी करून नवी यादी तयार करण्यात येणार आहे. अशा आरोपींविरोधात कायदेशीर कारवाईला गती देण्यात येणार असल्याचे सह पोलिस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) विश्वास नागरे-पाटील यांनी सांगितले.

महत्त्वाची बातमी : उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक ? मोदींच्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठीच्या प्रास्तवित जागेवर उभारलं जाणार मेट्रो कारशेड?

मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यात किमान डझनभर वॉन्डेट आरोपी आहेत. वर्षांनुवर्षे त्यांच्या डेटाचे अद्ययावतिकरण झालेले नाही. असेच आरोपी इतर गंभीर गुन्ह्यांमध्येही सहभागी असतात. अशा सराईत आरोपींच्या विरोधातील कारवायांची गती वाढवण्यात येणार आहे. तसेच आरोपीपत्र दाखल करण्यात आलेले आरोपींच्या विरोधात सीआरपीसी कलम 299 (फरार आरोपींविरोधात पुरावे नोंदणी करणे) अंतर्गत कारवाईला सुरूवात करण्यात येईल.तसेच त्यांच्या मालमत्ता जप्तीची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येईल. तसेच फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिस ठाण्यापासून परिमंडळ पातळीवर पद्धतशीररित्या या आरोपींना अटक करण्यातसाठी समन्वय ठेवण्यात येणार आहे. सायबर गुन्ह्यांमधील वॉन्डेट आरोपींसाठी पोलिसांनी अशी कार्यपद्धत वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांत सहभागी अनेक आरोपींना झारखंड येथून अटक करण्यास स्थानिक पोलिसांना यश आले आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पोलिस ठाण्यांच्या पातळीवर 25 सराईत गुन्हेगारांची यादी तयार करण्यात येणार असन एक पोलिस एक गुन्हेगार या योजनेमार्फत या गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून अशा आरोपींकडून हमीपत्र लिहून घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पूर्वी पाच-दहा हजार रुपयांच्या हमीपत्र भरले जायचे, त्याची रक्कम वाढवून 10 ते 15 लाखांचे हमीपत्र भरून घेण्यात येत आहेत. तसेच यातील जे गुन्हेगार गुन्हेगारी सोडून मुख्यप्रवाहात येऊन चांगले जीवन जगण्याच्या प्रयत्नात आहेत. अशांचे पुनर्वसन करण्यासही पोलिस मदत करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच संख्याबळाचे वाटपही पोलिस ठाण्यापातळीवर सरसकट न करता दाखल गुन्हे, विभागाची रचना, लोकसंख्या आदी लक्षात घेऊन करण्यात येणार आहे. कॉर्पोरेट व्यवहारांप्रमाणे पोलिस अधिका-यांना गुन्ह्यांची उकल करण्याची कामे वाटून देण्यात येणार आहेत. 

important part of operation all out mumbai police to make list of 25 most wanted criminals


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: important part of operation all out mumbai police to make list of 25 most wanted criminals