मुंबईत कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग वाढवा! मुख्यमंत्र्यांचे BMC च्या अधिकाऱ्यांना निर्देश 

मुंबईत कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग वाढवा! मुख्यमंत्र्यांचे BMC च्या अधिकाऱ्यांना निर्देश 

मुंबई : मुंबईत कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग वाढवून एका रुग्णामागे 20 नव्हे, तर 30 जणांचे ट्रेसिंग करा. 48 तासांच्या आत हाय रिस्क व्यक्तींच्या चाचण्या करा, असे निर्देश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. अनलॉकमुळे सध्या इमारतींमधील रुग्णांची संख्या वाढली असून 80 ते 85 टक्के रुग्ण या भागांमधील आहे. त्यामुळे वाढीव ऑक्‍सिजन आणि आयसीयू बेड्‌स वाढवण्याची तयारी करण्याचे आदेशही ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले. 

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही राज्यस्तरीय मोहीम राबवत आहोत. मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

काही निर्बंध शिथिल केल्यानंतर मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, "चेस द व्हायरस मोहिमेमुळे आपण या साथीला चांगले रोखले. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्यामुळे सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्वच्छतेला महत्त्व देणे अत्यंत गरजेचे. मास्क या पिढीसाठी आवश्‍यक बाब बनली आहे. लोकांनी स्वतःहून काळजी घ्यावी त्यादृष्टीने जागृती करणे आवश्‍यक आहे.' 

अजून दोन ते तीन महिने आव्हान 
धारावी आणि वरळीत पालिका कोरोना रोखण्यात यशस्वी झाली. त्यासाठी कौतुकही झाले, पण त्यामुळे हुरळून जात ढिलाई न दाखवता अधिक जोमाने काम करा. मुंबईत दिवसाला 1000 किंवा 1100 रुग्ण सापडत असताना आपण या साथीच्या शिखरावर आहोत असे वाटत होते, पण गेल्या दोन दिवसांपासून 1900 आणि 1700 रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुढील दोन ते तीन महिने हे आव्हान आपल्याला अधिक समर्थपणे पेलायचे आहे, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. 

ऑक्‍सिजनचे उत्पादन वाढवणार 
मुंबईत आणखी पाच ते सहा हजार बेडस्‌ उपलब्ध करून देऊ शकतो, तसेच ऑक्‍सिजन बेड आणि आयसीयू बेडच्या नियोजनाची गरज असल्याचे मत बैठकीत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबईतच नव्हे, तर राज्यातील कोरोना रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज लक्षात घेऊन राज्यात ऑक्‍सिजनचे उत्पादन वाढवून ते जास्तीत जास्त प्रमाणात वैद्यकीय कारणासाठी उपयोगात आणण्यासाठी आदेश काढावे लागतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

कोव्हिडपश्‍चात उपचार महत्त्वाचे 
कोव्हिडमधून बरे झालेल्या काही रुग्णांत पुन्हा दुष्परिणाम दिसत आहेत; मात्र हे दुष्परिणाम कोव्हिडचेच आहेत की आक्रमक औषधोपचाराचे आहेत, याची तपासणी केली पाहिजे. पोस्ट कोव्हिड उपचारांना तितकेच महत्त्व आहे. त्यासाठी चांगली व्यवस्था उभारा. त्यामुळे मृत्यू दर कमी होऊ शकतो, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले. 
------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com