होय...! महिलाविरोधी गुन्ह्यांत झालीये वाढ; खुद्द प्रशासनाची कबुली

होय...! महिलाविरोधी गुन्ह्यांत झालीये वाढ; खुद्द प्रशासनाची कबुली
होय...! महिलाविरोधी गुन्ह्यांत झालीये वाढ; खुद्द प्रशासनाची कबुली

नवी मुंबई : सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत २०१९ या वर्षात खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, मालमत्ता चोरी, प्राणघातक अपघात अशा गुन्ह्यांमध्ये घट झाली असली; तरी महिला अत्याचार, फसवणूक व सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मागील वर्षात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न आणि धार्मिक-जातीय तेढ निर्माण होईल अशी एकही घटना घडली नाही, असे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले. लोकसभा व विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आल्याबद्दल त्यांनी पत्रकार परिषदेत समाधान व्यक्त केले. 

ही बातमी वाचली का? मुंबईसह महाराष्ट्र गारठला!
 
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २०१९ मध्ये महिलांवरील अत्याचाराचे एकूण ६०२ गुन्हे दाखल झाले, त्यातील ५८७ म्हणजे तब्बल ९८ टक्के उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. परंतु, २०१८ च्या तुलनेत महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत ५६ ने वाढ झाल्याचे आढळले. लग्नाच्या भूलथापा देऊन (५७), नातेवाईक, मित्र, ओळखीच्या व्यक्तीकडून (१११) आणि अनोळखी व्यक्तीकडून (एक) असे बलात्काराचे १६९ गुन्हे २०१९ मध्ये दाखल झाले. त्यांतील १६६ गुन्हे उघडकीस आले आहेत. २०१८ च्या तुलनेत २०१९ मधील बलात्काराच्या गुन्ह्यांत १६ ने वाढ झाली.  

ही बातमी वाचली का? रायगड जिल्ह्यात म्हणून आहे, हुडहूडी
   
२०१९ मध्ये विनयभंगाचे २५१ गुन्हे घडले असून, त्यापैकी २३९ गुन्हे उघडकीस आले. या गुन्ह्यांतही २५ ने वाढ झाली. छळ करून महिलांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या गुन्ह्यांत घट झाली असली, तरी सासरकडील मंडळींकडून होणाऱ्या छळाच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. महिलांचा छळ केल्याप्रकरणी क्र. ४९८ अ या कलमान्वये १५० गुन्हे २०१८ मध्ये दाखल झाले होते; २०१९ मध्ये असे १७४ गुन्हे दाखल झाले, अशी माहिती वार्षिक पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी नवी मुंबईचे सहपोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, अशोक दुधे, सुनील लोखंडे आदी उपस्थित होते. शरीराविरुद्ध घडलेल्या एकूण ७२७ गुन्ह्यांतील ६९१ गुन्हे उघडकीस आले. या गुन्ह्यांत ५८ ने घट झाल्याचे सांगण्यात आले. २०१९ मध्ये खुनाचे ५३ गुन्हे नोंदवण्यात आले आणि ४४ गुन्हे उघडकीस आले. 

सायबर सेलकडे ४१७ तक्रारी
नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे २०१९ मध्ये ४१७ वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्या. त्यांतील ३५४ तक्रारी चौकशी करून निकाली काढण्यात आल्या, तर ६३ अर्ज चौकशीसाठी प्रलंबित आहेत. २०१८ मध्ये अशा १२० तक्रारी दाखल झाल्या आणि त्या सर्व निकाली काढण्यात आल्याचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले. सिटीझन पोर्टलद्वारे आलेल्या ४६७ तक्रारींपैकी ९२ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  

ऑनलाईन फसवणुकीत वाढ
फसवणुकीच्या गुन्ह्यात २०१९ मध्ये ८४ ने वाढ झाली. फसवणुकीचे ६६७ गुन्हे दाखल असून, त्यापैकी ४०६ गुन्हे (६१ टक्के) उघडकीस आले. सायबर फसवणुकीचे ६२ गुन्हे दाखल झाले असून, दोन कोटी ४२ लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक झाली. फेसबुकवर मैत्री करून चार, ऑनलाईन माध्यमातून १७, कार्ड क्‍लोनिंगद्वारे सहा, नोकरीच्या प्रलोभनाचे तीन, ओटीपीची माहिती घेऊन २३, ओएलएक्‍सद्वारे सहा, विवाह संकेतस्थळावरून दोन आणि डेटिंग ॲपद्वारे एक असे फसवणुकीचे ६२ गुन्हे दाखल झाले.  

आर्थिक गुन्ह्यांचा आलेख चढता  
नवी मुंबईत २०१९ मध्ये मालमत्ताविषयक २२६० गुन्हे घडले. या गुन्ह्यांत तब्बल २८ कोटी ९३ लाख १४ हजार रुपयांची मालमत्ता चोरीला गेली. पोलिसांनी ८६१ गुन्हे उघडकीस आणून नऊ कोटी १८ लाख ५० हजार रुपयांची म्हणजे ३२ टक्के मालमत्ता हस्तगत केली. २०१८ मध्ये २६ कोटी ५७ लाख ३७ हजार रुपयांची मालमत्ता चोरीस गेली होती. त्यापैकी सात कोटी ९६ लाख १३ हजारांची (३० टक्के) मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले होते. आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये ७५ गुन्ह्यांत १६४ आरोपींना अटक केली. त्यांच्यात फरार असलेल्या १११ आणि पाहिजे असलेल्या (वाँटेड) २५५ आरोपींचा समावेश असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com