esakal | फेसबुकद्वारे आर्थिक फसवणुकिच्या गुन्ह्यात वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

फेसबुकद्वारे आर्थिक फसवणुकिच्या गुन्ह्यात वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नागरिकांकडून इंटरनेटच्या वापरात एकीकडे वाढ होत असतानाच सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या क्लृफ्त्या वापरुन आर्थिक फसवणुक करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यामध्ये प्रामुख्याने फेसबुकचा वापर करुन आर्थिक फसवणूक करण्याच्या गुह्यांमध्ये मोठया प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत देखील या चालू वर्षात अशा स्वरुपाचे अनेक गुन्हे घडले आहेत. त्यामुळे नागरिकांनी फेसबुकच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घ्यावी असे, आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.

लॉकडाऊन नंतरच्या काळात फेसबुकवरुन मैत्री करुन विशेषत: महिला व तरुणींची आर्थिक फसवणुक करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. या प्रकारात सायबर गुन्हेगारांकडून बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्याद्वारे तरुणी व स्त्रियांसोबत मैत्री करुन त्यांना परदेशातून गिफ्ट स्वरुपात मोठी रक्कम, दागिने व महागडÎा वस्तू कुरीयरद्वारे पाठविण्याचा बहाणा केला जातो. त्यानंतर परदेशातून पाठवलेले गिफ्ट एअरपोर्टवर कस्टम विभागाकडून पकण्यात आल्याचे भासवून सदर गिफ्ट मिळविण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून महिलांना रोख रक्कम पाठविण्यास भाग पाडण्यात येते. अनेक महिला, सायबर गुन्हेगारांच्या या भुलथापांना बळी पडून त्यांनी सांगितल्यानुसार त्यांना लाखो रुपये पाठवून मोकळे होतात. मात्र त्यानंतर त्यांना गिफ्ट मिळणार नसल्याचे व आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात येते.

नेरुळमध्ये गत महिन्यात घडलेल्या घटनेत सायबर गुन्हेगारांनी एका ७० वर्षीय वृद्ध महिलेसोबत डॉ.विक्टर जॉन नावाने फेसबुकद्वारे मैत्री केली. त्यानंतर त्यांना लंडन येथून खुप सारे सोने व डॉलर गिफ्ट म्हणून पाठवित असल्याचे सांगितले. त्यानंतर या टोळीने लंडन येथून पाठविलेले गिफ्ट पार्सल दिल्ली एअरपोर्ट मध्ये कस्टम विभागाने पकडल्याचे सांगून सदरचे पार्सल मिळविण्यासाठी कस्टम विभागाच्या बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर या टोळीने वेगवेगळी कारणे सांगून सदर वृद्धेकडून तब्बल सव्वा दहा लाख रुपये उकळले. मात्र त्यानंतर देखील या वृद्धेला गिफ्ट न मिळाल्याने तीने केलेल्या चौकशीनंतर तीची फसवणुक झाल्याचे लक्षात आले.

हेही वाचा: गोळीबाराच्या दोन घटनेत अमेरिकेत पाच ठार; 15 जखमी

दुसऱ्या घटनेत फसवणूक झालेली विवाहिता कळंबोलीत कुटुंबासह राहण्यास असून गत जानेवारी महिन्यामध्ये विजय गुडरे नामक व्यक्तीने पोलीस असल्याचे भासवून या विवाहितेसोबत फेसबुकद्वारे मैत्री केली होती. त्यानंतर विजय गुडरे याने सदर विवाहितेला जुनी कार विकत घेऊन देण्याचे व सदर कार ओला कंपनीत लावून त्याद्वारे तीला पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी या भामटयाने तीच्याकडे पैशांची मागणी केल्यानंतर सदर विवाहितेने आपले दागिने गहाण ठेवून या भामटयाला २ लाख २० हजार रुपये पाठवून दिले. मात्र त्यानंतर देखील सदर भामटयाने वेगवेगळी खोटी कारणे सांगुन तीच्याकडून आणखी रक्कमेची मागणी केली. त्यानंतर विवाहितने केलेल्या चौकशीत विजय गुडरे हा फसवणुक करत असल्याचे विवाहितेच्या लक्षात आल्यानंतर तीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

तिसऱ्या घटनेत फसवणुक झालेली ५० वर्षीय विधवा महिला नेरुळ मध्ये रहाण्यास असून काही महिन्यापुर्वी सायबर गुन्हेगारांच्या टोळीने या महिलेसोबत डॉ.मार्को नावाने फेसबुकवरुन मैत्री केली. त्यानंतर या टोळीने फेसबुकवरुन सदर महिलेची वैयक्तिक माहिती मिळवुन तीला जन्मतारखेपुर्वीच तीला बर्थडे गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने, घडयाळ, लेदर चफ्पल, शुज, बॅग व ३७ लाखाची रोख रक्कम पाठवणार असल्याचे आमिष दाखविले. तसेच सदर गिफ्टचे फोटो, व्हिडीओ व कुरीअरची माहिती तीला व्हॉट्सऍपवर पाठवुन तीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी गिफ्टचे कुरीयर पाठविण्याच्या बहाण्याने या महिलेला रोख रक्कम पाठविण्यास सांगितले. त्यानंतर या टोळीने वेगवेगळी कारणे सांगून सदर महिलेला तब्बल १३ लाख २९ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडले. मात्र त्यानंतर देखील या महिलेला कुठल्याच प्रकारचे गिफ्ट मिळाले नाही.

रोहन न्यायाधीश-सायबर एक्सपर्ट

फेसबुकद्वारे महिला व तरुणींसोबत मैत्री करुन त्यांची आर्थिक फसवणुक करण्याचे प्रकार सध्या वाढू लागले आहेत. अनेक तरुणी व महिला फेसबुकवर व सोशल मिडीयावर अनोळखी व्यक्तींचे फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारुन त्यांच्याशी चॅटिंगद्वारे संपर्क ठेवत असतात. अशा अनोखळी व्यक्तींकडून त्यांची फसवणुक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषता महिला व तरुणींनी अशा अनोळखी व्यक्तींशी फेसबुक अथवा सोशल नेटवर्कींगच्या माध्यमातून मैत्री करु नये. तसेच अशा व्यक्तींच्या अमिषाला व भावनिक आवाहनाला देखील बळी पडू नये.

हेही वाचा: बाळाच्या वडिलांबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाल्या नुसरत जहां

फेसबुकच्या माध्यमातून आर्थिक फसवणुक होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी.

१) स्वत:चे फेसबुक प्रोफाईल लॉक करावे, व अनावश्यक फेसबुक खाते कायमचे डिलीट करुन टाकावे

२) फेसबुकवर स्वत:चे फोटो व अन्य महत्वाची माहिती शेअर करु नये.

३) अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नये.

४) फेसबुकवरुन पैशाची मागणी केल्यानंतर त्या व्यक्तीला प्रत्यक्ष संपर्क करुन शहानिशा करावी.

५) बनावट फेसबुक अकाऊंट बंद करण्यासाठी जास्तीत जास्त व्यक्तींकडून तत्काळ फेक अकाऊंट असे रिपोर्ट करावे.

६) अनोळखी व्यक्तींशी अश्लील संभाषण करु नये.

७) फेसबुकव्दारे मैत्री झालेल्या फ्रेंडशी आर्थिक व्यवहार करु नये, समक्ष भेटून त्या व्यक्तीची खात्री करावी. तसेच त्या व्यक्तीची सार्वजनिक ठिकाणीच भेट घ्यावी.

८) शहानिशा न करता व प्रत्यक्ष न भेटता फेसबुकवरुन मैत्री किंवा लग्नाचे प्रपोजल स्विकारणे हे धोकादायक ठरू शकते.

loading image
go to top