‘माझी वसुंधरा’ अभियानात लोकसहभाग वाढवा; आदित्य ठाकरे यांचे आवाहन

‘माझी वसुंधरा’ अभियानात लोकसहभाग वाढवा; आदित्य ठाकरे यांचे आवाहन

मुंबई  : पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने राज्यात नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या पुणे आणि कोकण विभागातील नियोजनाची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन्ही विभागातील आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करुन माहिती घेतली. लोकप्रतिनिधी, शासनाचे विविध विभाग, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते यांच्यासह लोकसहभागातून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे आवाहन मंत्री ठाकरे यांनी यावेळी केले. 

यावेळी मंत्री ठाकरे म्हणाले की, अनियमीत पाऊस, निसर्गसारखी वादळे किंवा कोरोनासारखी संकटे ही सर्व हवामानातील बदलामुळे निर्माण झालेली संकटे आहेत. यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविण्यासाठी पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा उपाय नाही. त्यामुळे येत्या काळात ‘माझी वसुंधरा’ अभियानातील सर्व घटकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. याची सुरुवात शासकीय कार्यालयांमधून करण्यात यावी. शासकीय कार्यालयांमधील उर्जा वापराचे लेखापरिक्षण, पाणी वापराचे लेखापरिक्षण, कचऱ्याचे व्यवस्थापन, साधनसामुग्रीचे व्यवस्थापन, परिवहन साधनांचे लेखापरिक्षण, अडगळीतील सामानाचे व्यवस्थापन, कार्यालय परिसरातील वृक्षाच्छादन आदी बाबींवर काम करण्यात यावे. तसेच सर्वांनी आपल्या प्राधान्यक्रमात या योजनेचा समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, भावी पिढीला स्वच्छ जमीन, स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि मुबलक उर्जा देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी पर्यावरणाच्या विविध घटकांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. सर्वांनी समन्वयाने ‘माझी वसुंधरा’ अभियान प्रभावीपणे राबवून महाराष्ट्रास पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत अग्रभागी ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.  
पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर म्हणाल्या की, स्वच्छता अभियान, जलसंधारण, सौरऊर्जा अशा विविध योजनांच्या अभिसरणातून विविध उपक्रम राबवून ‘माझी वसुंधरा’ अभियानाला गती देण्यात यावी. डीपीडीसी, वित्त आयोग, सीएसआर, सीईआर आदींमधून निधी उपलब्ध करुन विविध उपक्रम राबविता येतील. सर्वांनी प्राधान्यक्रमावर ही योजना राबवावी, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी ऑनलाईन उपस्थित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या भागात करण्यात आलेले नियोजन आणि प्रस्तावित विविध उपक्रमांची माहिती दिली. अभियानामध्ये स्वयंसेवी संस्था, एनसीसी, एनएसएस यांचा सहभाग घेणे, नद्यांची स्वच्छता करणे, जैवविविधता जपणे, हरितपट्टे तयार करणे, कचऱ्याचे विलगीकरण, सायकल ट्रॅक निर्मिती, देशी झाडांचे रोपण, अर्बन फॉरेस्ट तयार करणे, सायकल शेअरींग, मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण, कांदळवनांचे जतन-संवर्धन, शहरांमधील धुळ कमी करण्याचे नियोजन, गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचऱ्याचे व्यवस्थापन, नदी, तलाव, नाल्यांचे पुनुरुज्जीवन, सिमेट रस्त्यांजवळील झाडांचे डी-चौकींग करणे  आदी विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. 

मंत्री ठाकरे यांच्यासह पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे हे मंत्रालयातून सहभागी झाले होते, तर पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह दोन्ही विभागातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते.

Increase public participation in the majhi vasundhara campaign Aditya Thackerays appeal

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com