अपेक्षांचे वाढते ओझे 

दीपक घरत
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

किरकोळ कारणांमुळे आत्महत्येच्या घटना; पालक चिंताक्रांत 

पनवेल : बंद पडलेली सायकल दुरुस्त करून द्या, अशी मागणी करूनदेखील पालकांनी सायकल दुरुस्त न करू दिल्याने एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी सायंकाळी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रोडपाली येथे घडली. रोडपाली येथे वास्तव्यास असलेले किशोर राठोड यांचा आकाश हा १४ वर्षीय मुलगा कळंबोली येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात ९ वीत शिक्षण घेत होता. किरकोळ कारणामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सतत वाढत आहे. पालक व विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षांचे ओझे दिवसेंदिवस वाढत असल्याने या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे मत जाणकार व्यक्‍त करीत आहेत. 

हे पण वाचा ः तिला वाचवता वाचवता तोच जळाला 

रविवारी आकाशला शाळेत जाण्यासाठी वडिलांनी घेऊन दिलेली सायकल काही दिवसांपासून खराब झाली होती. बंद असलेली सायकल दुरुस्त करून देण्याची मागणी आकाश आईवडिलांकडे काही दिवसांपासून करत होता.आकाश करत असलेल्या मागणीकडे आईवडिलांनी दुर्लक्ष केल्याने निराश झालेल्या आकाशने आईवडील कामानिमित्त घराबाहेर असताना घरातील फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावत आत्महत्या केली. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बळीराम घंटे पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे किरकोळ कारणासाठी अल्पवयीन मुले आत्महत्या करत असल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने या बाबत संशोधन करण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. 

हे पण वाचा ः शीना बोरा हत्‍या प्रकरण : माजी पोलिस आयुक्‍तांचा ‘मोठा’ गौप्यस्‍फोट...

परीक्षेचा ताण पालकांच्या अवास्तव अपेक्षा, विद्यार्थ्यांचा कल आणि गुणवत्ता लक्षात न घेतल्याने अभ्यासक्रम पेलताना विद्यार्थ्यांची होणारी ओढाताण यामुळे अशा आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. हल्लीच्या धावपळीच्या युगात पालकांचे पाल्यांबरोबर आंतरिक नाते कमी होत चालल्याने विद्यार्थी आत्महत्येकडे वळत आहेत. गेल्या पाच वर्षात चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. अशा घटनांनी पालक चिंताक्रांत आहेत. 

मुलांनी समाजमाध्यमांपासून दूर राहावे याकरिता पालकांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. मुलांच्या सर्वच इच्छा पूर्ण करण्याचा पालकांनी प्रयत्न करू नये. जेवढा जास्त वेळ पाल्याशी संवाद साधता येईल, तेवढा जास्त संवाद पालकांनी ठेवला पाहिजे.
- डॉ. सुयोग पाटील, होमियोपॅथिक तज्ज्ञ

पालक व मुलांमधील संभाषण कमी होऊ लागल्याने मुले इतक्‍या टोकाचा निर्णय घेऊ लागली आहेत. पालकांचा मुलांसोबत जास्तीत जास्त संवाद घडल्यास असे प्रकार कमी होऊ शकतात. 
- सतीश गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कळंबोली

जुलै २०१५ - कळंबोलीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सातवीत शिकणाऱ्या विघ्नेश साळुंखे (१२) या विद्यार्थ्याने शुक्रवारी सकाळी शाळेच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली.

जुलै २०१६ - कळंबोलीमधील पुष्पा सूर्यवंशी या विद्यार्थिनीला दहावीमध्ये ८२ टक्के गुण मिळाले होते.; मात्र प्रवेश मिळणार नसल्याचे समजल्याने पुष्पा हिने आत्महत्या केली.

नाेव्हेंबर २०१९ - वडिलांनी मोटरसायकल देण्यास नकार दिल्याने ११ वीतील विद्यार्थ्याने पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

जानेवारी २०२० - खारघरमधील साइस्प्रिंग इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून उडी घेऊन गुरुशरण कौर या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ती काही विषयांत नापास झाली होती.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increasing burden of expectations