esakal | लैगिंक अत्याचारानंतर ३२ वर्षांच्या महिलेला अमानुष मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

लैगिंक अत्याचारानंतर ३२ वर्षांच्या महिलेला अमानुष मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लैंगिक अत्याचारानंतर एका ३२ वर्षीय महिलेला अमानुष मारहाण करत तिच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना साकीनाका (Sakinaka) परिसरात घडली आहे. अधिक रक्तस्राव झाल्याने पीडित महिलेचा उपचारादरम्यान शनिवारी (Saturday) मृत्यू झाल्याची माहिती राजावाडी रुग्णालयातून देण्यात आली. घटनेनंतर पळून गेलेला आरोपी मोहन चौहान (Mohan Chauhan) (वय ४०) याला काही तासांतच साकीनाका पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली असून वांद्रे (Bandra) स्थानिक न्यायालयाने त्याला १० दिवसांची म्हणजेच २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस (Police) कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, घटनेने देशभरात संतप्त पडसाद उमटले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले आहेत.
साकीनाका परिसरातील खैरानी रोड, चांदिवली स्टुडिओसमोर संबंधित घटना घडली. एका सुरक्षारक्षकाने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला त्याबाबत माहिती दिली. त्यानुसार साकीनाका पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण ढुमे व त्यांचे सहकारी दहा मिनिटांत घटनास्थळी पोहचले. तिथे त्यांना एका टेम्पोमध्ये पीडित महिला गंभीर अवस्थेत पडल्याचे दिसले. तिच्या गुप्तांगातून रक्तस्राव होत होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्याच टेम्पोतून तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू केले. मात्र रक्तस्राव थांबत नसल्याने रात्री उशिरा तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृती गंभीर असल्याने तिला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. मात्र, शनिवारी दुपारी बारा वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा: "साकीनाका इथली घटना महाराष्ट्राला न शोभणारी";पाहा व्हिडिओ

साकीनाका पोलिसांनी घटनेची माहिती देणाऱ्या सुरक्षारक्षकाची जबानी नोंदवून त्याने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मोहन चौहानविरुद्ध हत्येचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये आरोपीचा चेहरा कैद झाला होता. घटनेनंतर तो उत्तर प्रदेशातील गावी पळून जाण्याच्या तयारीत होता; मात्र सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करत पोलिसांनी त्याआधीच साकीनाका परिसरात त्याला बेड्या ठोकल्या. चौकशीत त्यानेच महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला अमानुषपणे मारहाण करत तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसवल्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा: साकीनाका दुर्देवी घटनेचे राजकारण करु नका - संजय राऊत

आरोपीचे महिलेसोबत प्रेमसंबंध !


पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी मोहन चौहान आणि पीडित महिला दोघेही साकीनाका परिसरात राहत होते. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशच्या जौनपूरचा रहिवासी आहे. आठ ते नऊ वर्षांपासून तो मुंबईत राहत आहे. चालक म्हणून काम करणाऱ्या मोहनला काम मिळत नसे तेव्हा तो साकीनाका परिसरातच पैशासाठी कचरा गोळा करायचा. रात्री पदपथावरच झोपत होता. त्याला दारूसह अमली पदार्थाचे व्यसन होते. त्याचे पीडित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. ते दोघे काही वर्षांपासून लग्न न करता एकत्र राहत होते; मात्र त्यांच्यात अनेकदा खटके उडत असत. त्यातून तो तिला सतत मारहाण करीत होता. घटनेच्या रात्री दोघांमध्ये अशाच एका कारणावरून कडाक्याचा वाद झाला होता. त्यातून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला अमानुष मारहाण केली. तिच्या गुप्त भागाला दुखापत करून तिला गंभीर अवस्थेत तिथेच टाकून तो पळून गेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

महिनाभरात आरोपपत्र सादर करण्याचे आदेश
पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी संबंधित घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय असल्याचे म्हटले आहे. पोलिस आयुक्त कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषद त्यांनी खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचा प्रयत्न राहील, असे सांगितले. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. एका महिन्यात तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र सादर करण्याचे आदेश पथकाला देण्यात आले आहेत. पीडित महिला शुद्धीवर न आल्याने तिचा जबाब पोलिसांना नोंदवता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे.

हेही वाचा: "आम्ही हतबल आहोत"; अभिनेत्रीला सतावतेय अफगाणिस्तानमधल्या नातेवाईकांची चिंता

आरोपीच्या नातेवाईकांची चौकशी


अटकेच्या वेळेस आरोपीच्या कपड्यावर रक्ताचे डाग सापडले आहेत. ते कपडे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. आरोपी ज्या सीसीटीव्हीत कैद झाला त्याचे फुटेजही ताब्यात घेण्यात आले आहे. तक्रारदार सुरक्षा रक्षकासह पीडित महिलेच्या काही नातेवाईकांची जबानी घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. पीडित महिलेसोबत आरोपीचे सतत वाद होत असल्याचे काही पुरावे पोलिसांना सापडले आहेत. पोलिसांनीही टेम्पोही ताब्यात घेतला आहे. त्याची तपासणी सुरू आहे. मृत महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना सादर केला जाणार आहे. शवविच्छेदनाचे व्हिडीओ रेकॉडिंग करण्यात आले आहे. तपासादरम्यान पोलिसांना आरोपी मोहनच्या भावासह चुलत बहिणीची माहिती मिळाली आहे. त्यांचीही लवकरच पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांना गुन्ह्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे, असे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.

एकाच व्यक्तीचे कृत्य


सुरुवातीला पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची चर्चा होती; मात्र आतापर्यंतच्या तपासात तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला नसून एका व्यक्तीने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. यापूर्वी या गुन्ह्यात सामूहिक बलात्कारासंबंधी ३४ हे कलम लावण्यात आले होते. आता ते काढून टाकण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांनी तपासाला बाधा येईल, अशी गुन्ह्यातील छायाचित्रे किंवा व्हिडीओ प्रकाशित करू नये, असे आवाहनही पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केले. महिलेला इतक्या क्रूरपणे का मारहाण करण्यात आली? त्यांच्यात कुठल्या विषयावर वाद झाला होता? आरोपीची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी होती का? याबाबतही तपास सुरू आहे. लवकरच त्यांचा खुलासा केला जाईल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.


डाॅक्टरांच्या प्रयत्नांना अपयश
पीडित महिलेने रुग्णालयात २८ तास मृत्यूशी झुंज दिली. महिलेच्या जननेंद्रियांव्यतिरिक्त शरीराच्या बाह्य आणि अंतर्गत भागांवर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. तिला वाचवण्यासाठी राजावाडी रुग्णालयातील डाॅक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले; पण अपयश आले, अशी माहिती राजावाडी रुग्णालयाच्या अधीक्षक डाॅ. विद्या ठाकूर यांनी दिली. डॉ. ठाकूर यांनी सांगितले की, पीडित महिलेला शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी ११.३० वाजता तिचा मृत्यू झाला. महिलेला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. दाखल झाल्यापासून ती व्हेंटिलेटरवर होती. तिच्या जननेंद्रियाच्या भागाला गंभीर दुखापत झाली होती. शरीराच्या काही भागांवर जखमांव्यतिरिक्त पोटाच्या आतील भागावर मार लागला होता. सात डॉक्टरांच्या चमूने महिलेच्या जननेंद्रियांवर आणि इतर भागांवर शस्त्रक्रिया केली. मात्र, शवविच्छेदन अहवालाबाबत काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला. प्रकरण संवेदनशील असून पोलिस त्याबद्दल अधिक माहिती देतील, असे सांगण्यात आले.

loading image
go to top