माथेरानमध्ये पर्यटकांच्या डोक्यावर मृत्यूच्या घिरट्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

माथेरान पंचशीला बंगला येथील विशाखा पार्टे (32) या अंगणात मुलांची शिकवणी घेत असताना झाडाची एक मोठी फांदी त्यांच्यासह निकिता देशमुख (27) या महिलेच्या अंगावर पडली.

माथेरान : प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमधील जंगलाला लागलेल्या वाळवीमुळे एका झाडाची फांदी पडून दोन महिला जखमी झाल्या. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

संतापजनक : कपडे बदलण्याच्या खोलीत छुपा कॅमेरा

माथेरान पंचशीला बंगला येथील विशाखा पार्टे (32) या अंगणात मुलांची शिकवणी घेत असताना झाडाची एक मोठी फांदी त्यांच्यासह निकिता देशमुख (27) या महिलेच्या अंगावर पडली. विशाखा यांच्या हातापायाला आणि पाठीला दुखापत झाली; तर निकिता यांच्या डोक्‍याला आणि हाताला दुखापत झाली आहे. या घटनेत विशाखा यांच्याकडे शिकवणीसाठी आलेली लहान मुले बचावली. दोन्ही जखमींना माथेरानमधील बी. जे. रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बदलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हे वाचा : रोहित पवारांची आमदारकी धोक्यात?

पाच वर्षांपूर्वीही घाला 
माथेरान येथील वृत्तपत्र वितरक सुरेश भागू केळगणे यांचा पाच वर्षांपूर्वी मुख्य बाजारपेठेत अंगावर झाड कोसळून मृत्यू झाला होता. दुपारी ही घटना घडली होती. त्या वेळी महसूल विभागाने तत्काळ पंचनामा करून त्याच्या परिवारास चार लाख रुपयांची मदत केली होती. 

वाळवीने जंगल पोखरले 
माथेरानमध्ये शंभरपेक्षा अधिक वर्षांची झाडे आहेत. अति उंच झाडे असलेले माथेरान हे एकमेव शहर आहे; पण त्यांना वाळवीचा प्रादुर्भाव झाला आहे. दहा ते बारा वर्षांपूर्वी त्याला सुरुवात झाली. त्यामुळे मोठमोठे झाडे संकटात आहेत. वादळवारा नसतानादेखील झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. वन विभागाकडून वाळवीवर नियंत्रण ठेवण्यासाठी झाडांना नैसर्गिक रंग लावण्यात येत होता. त्यामुळे वाळवी नियंत्रणात होती. आता वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने जंगल नष्ट करू लागली आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Injured two women after falling a tree