अरे वाह! इमारतीत उभारलं आयसोलेशन सेंटर; कोरोना रुग्णांवर उपचारही होणार..   

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

 कोरोना रुग्णांवर उपचार करताना सरकारी यंत्रणांवर पडणारा ताण लक्षात घेता इमारतींमध्ये स्वतःची छोटेखानी विलगीकरण केंद्रे-उपचार केंद्रे उभारण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून कांदिवलीच्या विश्वदीप इमारतीत उभारलेल्या केंद्राचे उद्घाटनही आज झाले.

मुंबई: कोरोना रुग्णांवर उपचार करताना सरकारी यंत्रणांवर पडणारा ताण लक्षात घेता इमारतींमध्ये स्वतःची छोटेखानी विलगीकरण केंद्रे-उपचार केंद्रे उभारण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून कांदिवलीच्या विश्वदीप इमारतीत उभारलेल्या केंद्राचे उद्घाटनही आज झाले. 

मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारी यंत्रणेवर पुष्कळ ताण पडत आहे. सरकार आपल्या परीने प्रयत्न करीत असल्याने केवळ सरकारवर टीका न करता आपणही आत्मनिर्भर व्हावे यासाठी जास्तीत जास्त ठिकाणी अशी स्वतःची केंद्रे उभारण्याचे आवाहनही शेट्टी यांनी जनतेला केले. 

 हेही वाचा: सोमवारपासून एसटीच्या 250 जादा बस धावणार; वाचा कोणासाठी आणि कुठे सेवा सुरू होणार

ही उपचार-विलगीकरण केंद्रे केवळ त्या त्या इमारतींच्या रहिवाशांसाठीच असतील. ज्या इमारतींमध्ये क्लब हाऊस, व्यायामशाळा, रेफ्यूज एरिया इ. सोयी असतात तेथे बिछाने किंवा गाद्या टाकून अशी केंद्रे उभारावीत. तेथे प्राणवायू पुरवणारे छोटे युनिट किंवा सिलेंडर, पीपीई किट, सॅनिटायझर, इन्फ्रारेड थर्मामीटर, ऑक्सीमीटर, मास्क, जंतुनाशक स्प्रे मशीन आदी उपकरणे  सोसायटीने घेतली आहेत.

हे केंद्र आयसीएमआर च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व सरकारी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उभारले आहे. या केंद्राच्या वापराबद्दल सोसायट्या सदस्यांना काही रक्कमही आकारू शकतात. गंभीर रुग्णांना तेथे ठेवले जाणार नाही. 

केवळ विलगीकरणातील नागरिक, कमी लक्षणे वा अजिबात लक्षणे नसलेल्या रुग्णांना येथे ठेवता येईल. ज्यायोगे त्यांची स्वस्तात, सुरक्षित, हमखास व घरगुती व्यवस्था होऊ शकेल. येथे आपले फॅमिली डॉक्टर किंवा सोसायटीतले डॉक्टरही रुग्णांची काळजी घेतील. तसेच महापालिकेचे डॉक्टर रोज रुग्णांना दूरध्वनी करून विचारपूस करतातच,  असे विश्वदीप इमारतीतील कोरोना कमिटीचे प्रमुख निलेश व्यास यांनी सकाळ ला सांगितले.  

हेही वाचा: संजय राऊत सोनू सूदवर घसरले, म्हणाले...

 

कोरोनाला घाबरू नका:

काल आम्ही मालाडमध्ये घेतलेल्या एका आरोग्य शिबिरात पाच जणांना कोरोना झाल्याचे आढळले. त्यामुळे आज त्याच परिसरात घेतलेल्या आरोग्य शिबिराला घाबरून कोणीही हजेरी लावली नाही. मात्र हे चुकीचे आहे, कोरोनाला कोणीही घाबरू नये. उलट कोरोनावर योग्य वेळी उपचार केले नाही, तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, असे गोपाळ शेट्टी यांनी सकाळ ला सांगितले.

isolation center made in building in mumbai read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: isolation center made in building in mumbai read full story